ठाणे : वर्तकनगर आणि भीमनगरवासीयांसाठी हक्काचे असलेल्या वर्तकनगरच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयातील लसीकरण केंद्र पालिका प्रशासनाने दोन आठवड्यापूर्वी तडकाफडकी बंद केले. त्यामुळे हजारो रहिवाशांना लसीकरणासाठी द्राविडीप्राणायाम भोगावा लागत आहे. नागरिकांची ही फरफट थांबवून तत्काळ पर्यायी लसीकरण केंद्र या भागात उभारावे, अशी मनसेचे संदीप पाचंगे यांनी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
वर्तकनगर, साईनाथनगर आणि भीमनगर परिसरात एकूण २० हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांसाठी गेल्या चार महिन्यापासून योग्य पद्धतीने लसीकरण केंद्र सुरू होते. मात्र, मागील दोन आठवड्यापासून रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याचे कारण देत ते बंद केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना लसीकरणासाठी लोकमान्यनगर, बेथनी रुग्णालयाजवळील लसीकरण केंद्राकडे धाव घ्यावी लागत आहे. या परिसरातील वृद्धांची तसेच महिलांची सध्या पावसाळ्याच्या काळात मोठी गैरसोय होत असून, हे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे, याप्रश्नी पाचंगे यांनी ठाणे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैजयंती देवगेकर त्यांची भेट घेतली. यावेळी मनसेचे प्रभाग अध्यक्ष अमोल राणे आणि उपविभाग अध्यक्ष अमित मोरे उपस्थित होते.