शशी करपे / वसईयेथील पोलीस वसाहतीच्या जागेच्या नकाशात बेकायदेशीर फेरबदल करून सरकारी जागेची ‘चोरी’ करण््यात आली आहे. त्याठिकाणी रस्ता बनवण्यात आला आहे. हा प्रकार पोलीसांच्या सौभाग्यवतींनी उजेडात आणल्यानंतरही या जमीन चोरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळ त्यांनी प्रजासत्ताकदिनी तहसिलसमोर उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या जमिनीची चोरी करणाऱ्यासह त्याला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. किल्ल्याशेजारील १ हेक्टर ८४ गुंठे जागेच्या परिसरात पोलीस ठाणे आहे. मात्र, सरकारी मालकीच्या या जागेची चोरी झाल्याचे सुकेशिनी शशिकांत कांबळे यांनी उजेडात आणला आहे. कोट्यवधी रुपये किंमतीची सरकारी जमिन हडप करून एका व्यक्तीने त्याजागेतून रस्ता बनवला आहे. याप्रकरणी महसूल खात्याने ही जमिन ताब्यात घेण्याचे आदेश दिले असतांनाही पोलीस विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.वसई पोलीस वसाहतीच्या जागेचा सार्वजनिक बांधकाम खात्याने भूमी अभिलेख कार्यालयाकडून २०१३ आणि २०१६ मध्ये सरकारी सर्व्हे करून तिचा नकाशा केला होता. त्याची प्रत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम खात्याकडे उपलब्ध आहे. मात्र, वसई किल्ल्याशेजारील जागेतून एका व्यक्तीने रस्ता बनविल्यानंतर त्याची चौकशी केली असता हा प्रकार उजेडात आला.२०१६ सालच्या सरकारी नकाशात पोलिस वसाहतीच्या जागेत अतिक्रमण आणि एक रस्ता तयार करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र, पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या नकाशात आणि सरकारी नकाशात मोठी तफावत आढळून आली. पोलिसांकडे असलेल्या नकाशात अतिक्रमण आणि रस्ता दिसत नव्हता. त्यानंतर केलेल्या चौकशीत पोलीस ठाण्यातील नकाशा गायब करून त्याठिकाणी एका खाजगी सर्व्हेयरकडून जागेचा सर्व्हे करून बोगस नकाशा तयार करण्यात आल्याची बाब उजेडात आली. सरकारी जागेचा सर्व्हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडूनच होणे गरजेचे असताना एका खाजगी व्यक्तीकडून सर्व्हे करून नकाशा बदलण्यात आला आहे. त्यानंतर सुकेशिनी कांबळे यांनी तक्रार केल्यानंतर चौकशी सुुरु झाली. तहसिलदारांकडून झालेल्या चौकशीत सरकारी जागा हडप केल्याचे निष्पन्न झाले.
वसई पोलीस वसाहतीतील जमीन चोरीस
By admin | Published: January 23, 2017 5:15 AM