वसई : वसई विरार महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन योजना यांची माहिती भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांना दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे.१३ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यातील महापालिकांनी ज्यांची लोकसंख्या एक दशलक्ष पेक्षा अधिक आहे, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आगीच्या धोक्यांना प्रतिसाद आणि अग्नीशमन दलासाठी योजना तयार ठेवणे आवश्यक आहे. २०११ च्या जनगणेनुसार वसई विरार महापालिकेची लोकसंख्या १२ लाख २१ हजार २३३ इतकी आहे. राज्यभरातील इतर महापालिकांनी आपल्याकडील अग्निशमन योजना भारताचे नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (कॅग) यांच्यासमोर प्रसारीत केलेली आहे. मात्र, वसई विरार महापालिकेने आपल्याकडील अग्निशमन यंत्रणेची माहिती दिली नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात नमूद केले आहे.महापालिकेकडे अत्याधुनिक साधनसामुग्री अस्तित्वात असताना त्याची माहिती कॅगला दिली नाही. कारण यात काहीतरी गैरप्रकार असल्याचा संशय शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. महापालिका नागरीकांकडून अग्निशमन कर वसुल करते. त्या तुलनेत नागरीकांना सुरक्षा पुरवण्यात महापालिकेकडे पुरेशी यंत्रणा नसणे ही दुर्दैवी बाब असल्याचा आरोप गावडे यांनी केला आहे.महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती आणि रहिवाशी इमारती आहेत. शेकडोचाळी आणि इमारतींमध्ये लोक दाटीवाटीने रहात आहेत. सध्या अस्तित्वात असलेली अग्निशमन यंत्रणा अपुरी असून कर्मचारी वर्गही अपुरा आहे. भविष्यात दुदैवाने एखादा मोठा बाका प्रसंग उद् भवल्यास सध्याच्या यंत्रणेला त्यावर नियंत्रण आणणे अवघड जाणार आहे, अशी तक्रारही करण्यात आली आहे.
वसई-विरार महापालिकेच्या अग्नीशमन विभागात संशयाचा धूर, नगरसेवकाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:10 AM