उल्हासनगर : कॅम्प नं-४ व्हीनस चौक शेजारी महापालिकेने लाखो रुपये खर्चून वसणशहा उद्यान बांधून ५ मार्च २०१९ रोजी धुमधडाक्यात उद्यानाचे उदघाटन केले. मात्र आज उद्यान इतिहास जमा होण्याच्या मार्गावर असून महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ व्हीनस चौकात मोर्यांनगरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वर्षानुवर्षे भाजी विक्रेते व फळविक्रेते आपला व्यवसाय करीत होते. वाहतूकीला अडथळा होतो. व त्याजागी उद्यान बांधण्याच्या नावाखाली महापालिकेने त्या दुकानावर जेसीबी मशीन आणून ५ वर्षांपूर्वी पाडकाम कारवाई केली. त्यानंतर लाखो रुपयांचा निधीतून महापालिकेने संत वसणशहा उद्यान बांधून ५ मार्च २०१९ साली तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण, महापौर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आले. मात्र त्यानंतर उद्यानाला ग्रहण लागले असून शेजारील इमारातधारकांनी उद्यानाच्या जागेवर दावा केल्याची चर्चा सुरू झाली. इमारतीच्या कामाच्या वेळी उद्यानाची भिंत पाडण्यात आल्यावर एकच खळबळ उडाली. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी त्यावेळी याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे संकेत दिले होते.
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या उद्यानावर उठसुठ कोणीही दावा कसा काय करू शकतो? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. उद्यान बांधले त्यावेळी जागा महापालिकेच्या मालकीची आहे की नाही? याबाबतची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना नोव्हाती का. उद्यान बांधतेवेळी शेजारील इमारतधारकांना आक्षेप का घेतला नाही? असे अनेक प्रश्न उभे ठाकले आहे. महापालिकेने याप्रकरणी वेळीच कारवाई केली नाहीतर, उद्यान लवकरच इतिहास जमा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत महापालिका मालमत्ता विभागाच्या संबंधित विभागप्रमुखा सोबत संपर्क केला असता, झाला नाही.