भार्इंदर : माजी नगरसेविका रीटा शाह यांच्या जातप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यावर १० जानेवारीला न्यायालयाने २०१२ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीतील प्रभाग १८ अ च्या मतमोजणीला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर, शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार वत्सला पाटील यांचा १ हजार ३३ मतांनी विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संभाजी पानपट्टे यांनी जाहीर केले. हा प्रभाग इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव होता. त्यानुसार, शाह यांनी आॅगस्ट २०१२ मधील पालिका निवडणुकीत आपली जोगी ही जात इतर मागासवर्गीय प्रवर्गात येत असल्याची नोंद उमेदवारी अर्जात केली होती. त्यावर, पाटील यांनी आक्षेप घेतला होता. तो ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शाह यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला. याविरोधात शाह यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही न्यायालयाने शाह यांची याचिका फेटाळली. यानंतर, शाह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात त्यांनी आपली जात इतर मागासवर्गीय प्रवर्गातीलच असल्याने आपण निवडणूक लढवण्यास पात्र असल्याचा दावा केला. त्याच्या निकालादरम्यान निवडणुकीचा निकाल जाहीर न करण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने शाह यांच्या जातीचे प्रकरण उच्च न्यायालयात वर्ग करून त्यांच्या विनंतीवरील निकाल राखून ठेवला. तेव्हापासून प्रभाग १८ अ मधील निकाल राखून ठेवला होता. या निवडणुकीत पाटील यांच्यासह भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार तेजल परमार व काँग्रेसच्या सरिता वायंगणकर यांच्यात निवडणूक झाली. दोन्ही बाजंूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पालिकेला मतमोजणी करण्याचा आदेश दिला. त्याआधारे शुक्रवारी मोजणीला सुरुवात झाली. त्यात पाटील भाजपा पुरस्कृत उमेदवार परमार यांचा १०३३ मतांनी पराभव करत विजयी झाल्या. (प्रतिनिधी)
प्रभाग १८ अ मधून वत्सला पाटील विजयी
By admin | Published: January 28, 2017 2:38 AM