कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. ऐन आॅक्टोबर हीटमध्ये भाजीपाल्याच्या भाववाढीचाही चटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, जुन्नर, अहमदनगर, नाशिक या भागांतून दररोज ३०० गाड्यांमधून शेकडो टन भाजीपाला येतो. मात्र, बुधवारी केवळ ११२ गाड्या मालाची आवक झाली. ६० टक्के माल कमी आल्याने बाजार समितीचे उत्पन्न निम्मे घटले आहे. बाजारात विक्रीसाठी केवळ दोन हजार ५०० क्विंटल माल आला आहे. दररोज पाच हजार क्विंटल माल येतो. होलसेल बाजारातील हाच भाव किरकोळ बाजारात दीड पटीने जास्त असतो. एका किलोमागे १५ रुपये इतकी वाढ करून भाजीपाला विकला जातो. भाज्यांची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत. त्याचा फायदा किरकोळ बाजारातील विक्रेते घेत आहेत. मात्र, ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. परतीच्या पावसाने विक्रेत्यांची चांदी, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे. परतीचा पाऊस, बदलते हवामान यामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. कल्याण बाजार समितीमध्ये होलसेल बाजार हा इतका चढ्या दराचा नसून किरकोळ बाजारपेठेत भाज्या महाग आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या तुलनेत कल्याण बाजार समितीतील भाजीपाल्याचे भाव तुलनेने कमी असल्याचे समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.कल्याण कृषी उत्पन्न बाजारात मटारचा भाव सगळ्यात जास्त आहे. मध्य प्रदेशातून मटारची बहुतांशी आवक होते. महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात त्याचे पीक घेतले जाते. त्यामुळे मटारचा होलसेल बाजारातील भाव हा १०० ते १२५ रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ११५ ते १३५ रुपये किलोने विकला जात आहे. मटारला सामान्य ग्राहकांची पसंती कमी असली, तरी हॉटेलमालकांकडून त्याला चांगली मागणी आहे.मध्यंतरी, टोमॅटो हा लालबुंद झाला होता. १०० रुपये किलोला टोमॅटो विकला जात होता. हळूहळू टोमॅटोचा भाव आटोक्यात आला. आता भाज्यांचे भाव वाढूनही टोमॅटोचा होलसेल बाजारातील दर हा प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोंथबिरीची आवक वाढल्याने एक जुडी एक रुपयाने विकली गेली. काही शेतकºयांनी तर माल बाजार समितीत फेकून दिला होता. बाजारात आवक कमी व भाव वाढल्याने माल फेकून देण्याची स्थिती सध्या तरी विक्रेते व शेतमाल विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांवर आलेली नाही.ही एक समाधानाची बाब आहे. मात्र, शेतमालाचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने होलसेल विक्रेत्याला जास्त दराने शेतमाल विकूनही पिकांचा खर्चदेखील भरून निघतो की नाही, याच विवंचनेत शेतकरी आहेत.>भाजीपाल्याचा भावभाजी दर (प्रतिकिलोत)वांगी १५ ते २० रुपयेफ्लॉवर २५ ते ३० रुपयेकोबी २० ते २५ रुपयेढोबळी मिरची ३० ते ४० रुपयेटोमॅटो २५ ते ३० रुपयेभेंडी २० ते २५ रुपयेगवार २५ ते ३० रुपयेघेवडा २५ ते ४० रुपयेकारली २० ते २५ रुपयेतोंडली २० ते २५ रुपयेमटार १०० ते १२५ रुपये
भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटली, परतीच्या पावसाचा फटका, किरकोळ बाजारात भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 3:35 AM