कल्याण : शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्या व फळे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत, या उद्देशाने राज्य सरकारच्या सूचनेनुसार कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतही आठवडाबाजार भरवले जाणार आहेत. महापालिकेने शहरातील १३ जागा आठवडाबाजारांसाठी निश्चित केल्या आहेत. या बाजारांचा फायदा शेतकरी व ग्राहकांना होणार आहे.शेतकऱ्यांच्या मालाला योग्य ती बाजारपेठ मिळावी आणि मालाची थेट विक्री व्हावी, या उद्देशाने सरकारच्या कृषी, पणन मंडळाने राज्यातील महापालिकांना मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार, केडीएमसीने प्रत्येक रविवारी श्री संत शिरोमणी श्री सावतामाळी शेतकरी आठवडाबाजार भरवण्यासाठी ११ महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. आठवडाबाजारात येणारे शेतकरी आणि ग्राहक यांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, बाजारासाठी स्टॉलची उभारणी, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, जागेची स्वच्छता आदी बाबींची पूर्तता कृषी, पणन मंडळ आणि शेतकरी, आठवडाबाजाराचे आयोजक यांनी करायची असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मोकळ्या जागेवर आठवडाबाजार सुरू करण्यासाठी नियोजन करण्याबरोबरच अग्निशमन विभाग, पाणीपुरवठा, स्वच्छता, पोलीस यांच्याकडील परवानगीबाबत कृषी, पणन मंडळाने योग्य ती कार्यवाही करून नाहरकत दाखला घ्यावा, अशीही सूचना महापालिकेने केली आहे. उपक्रमाची निकड लक्षात घेता जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु, आवश्यकता भासल्यास जागेत बदल करणे अथवा रद्द करणे, याबाबतचे अधिकार आयुक्तांना असतील, असेही परिपत्रकात केडीएमसी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
कल्याण-डोंबिवलीतही मिळणार थेट शेतातील भाजी
By admin | Published: February 15, 2017 4:32 AM