बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने ११ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली भाजी मंडई सध्या धूळखात आहे. मुख्य बाजारपेठ आणि स्थानकापासून दूर असल्याने विक्रेत्यांनी या मंडईकडे पाठ फिरवली आहे. ज्या विक्रेत्यांनी या मंडईत रस दाखवला आहे, त्यांनीही ग्राहकांअभावी येथील दावा सोडला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेला.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या पूर्वीच्या मुख्यालयाजवळ फळे आणि भाजी मंडईची इमारत नगरपालिकेने उभारली होती. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते आॅगस्ट २०११ मध्ये मंडईचे लोकार्पण झाले होते. या इमारतीत तळ मजल्यावर ३५ चौरस फूट आकाराचे ३९ गाळे आहेत. तर, पहिल्या मजल्यावर दोन हजार ९२२ फुटांचे सभागृह आहे. या मंडईतील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी पालिकेच्या वतीने निविदा मागवल्या होत्या. मात्र, २०११ च्या अखेरपर्यंत या निविदेवर प्रक्रि या झाली नव्हती. तत्कालीन कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनीही या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरून लवकरात लवकर ही मंडई सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ मंडईची प्रक्रि या ठप्प झाली होती.
काही विक्रेत्यांनी येथील दुकानांचा ताबाही घेतला. मात्र स्थानक परिसरात, नवरत्न हॉटेलपुढे फेरीवाले बसत असल्याने ग्राहकही मंडईत जाणे टाळत होते. भाजीविक्र ी होत नसल्याने अखेर विक्रेत्यांनीही भरलेले पैसे परत घेत येथील दुकानांवरील दावे सोडले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ही भाजी मंडई धूळखात आहे.
भाजी मंडई सुरू करत असताना रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज होती. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने मंडईत भाजीखरेदीसाठी नागरिक येत नाहीत. पालिकेच्या चुकीच्या नियोजनाचा फटका मंडईला बसला आहे.
तत्कालीन प्रशासनाने गाळ्यांचे वाटपही केले होते. ग्राहक येत नसल्याने त्यांनी गाळे सोडले. विक्रेत्यांना यात रस नसल्याने याचा दुसरा वापर करता येईल का, याचा लवकरच विचार केला जाईल. - प्रकाश बोरसे, मुख्याधिकारी