लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शेतकरी संपाचे परिणाम शुक्रवारपासून ठाण्याच्या बाजारपेठेत दिसू लागले आहेत. भाज्यांचे दर किरकोळ बाजारपेठेत आवक घटल्याने दुप्पट झाले. दुधाच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नसली, तरी आवक घटल्याने ३० ते ४० टक्के तुटवडा जाणवत आहे.शेतकऱ्यांच्या संपाचा गुरुवारी पहिल्या दिवशी फार फरक पडला नव्हता. भाज्यांचे दर स्थिर होते. मात्र, संपाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागल्याने शुक्रवारी नवी मुंबईच्या बाजारपेठेत नेहमीच्या तुलनेत अतिशय कमी भाजीपाल्याची आवक झाल्याने ठाण्याच्या किरकोळ बाजारपेठेत गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सर्व भाज्यांचे दर चांगलेच वधारले. अनेक विक्रेत्यांकडे आदल्या दिवशीचाच माल विक्रीसाठी होता. मात्र, तोही जवळपास दुप्पट दराने विकला गेला. शनिवारी भाजी मिळेल की नाही, याबाबत विक्रेत्यांकडून साशंकता व्यक्त केली जात असल्याने ग्राहकांनी महागडी भाजीखरेदी केली. संप लांबण्याच्या भीतीने ग्राहकांनी अतिरिक्त भाज्यांचा साठा केला. कोथिंबीर आणि पुदिन्याच्या जुड्यांची किंमत दुपटीपेक्षाही जास्त वाढल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. संप शनिवारीही कायम राहिला, तर आणखी आवक घटेल आणि किरकोळ बाजारात केवळ दरवाढच होणार नाही, तर अनेक भाज्यांचा तुटवडा जाणवेल, अशी माहिती विक्रेते सचिन मौर्या यांनी दिली. दरवाढ नाही, पण दुधाची टंचाईठाणे शहरात सुमारे दीड ते दोन लाख लीटर दुधाची आवक होते आणि तेवढीच विक्रीदेखील होते. मात्र, संपाच्या भीतीने ठाणेकरांनी बुधवारीच अतिरिक्त दूधखरेदी केल्याने गुरुवारी तुटवडा जाणवला होता. गुरुवारी राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर फोडल्याने, त्यातील दूध ओतल्याच्या घटना घडल्याने इतर जिल्ह्यांतून येणारे दूध न आल्याने शुक्रवारीही शहरात दुधाचा ३०-४० टक्के तुटवडा जाणवला, अशी माहिती ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली. तुटवडा असला तरी शहरात कु ठेही चढ्या दराने दूधविक्री केल्याच्या घटना घडल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले. अशाप्रकारची एकही तक्रार आपल्याकडे आली नसल्याचेही त्यांनी सांगितले. संप आजही कायम असल्याने उद्या दुधाचा आणखीन तुटवडा जाणवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
भाज्यांचे भाव दुप्पट!
By admin | Published: June 03, 2017 6:24 AM