ठाणे : जवळपास सगळ्याच भाज्या स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. लाल गाजराची आवक सुरू झाल्याने इंदूरच्या गाजराचे भाव कमी झाले आहेत. फळांचे भाव अद्याप कमी झालेले नाहीत. किराणाचे भाव मात्र स्थिर आहेत.
दिवाळीदरम्यान काही भाज्या स्वस्त झाल्या होत्या. काही भाज्या महागच होत्या. परंतु, या आठवड्यात जवळपास सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले. भाववाढीचे शतक गाठणारी कोथिंबीर आता १० रुपये प्रतिजुडी मिळत आहे. मेथी, शेपू, कोथिंबीर किरकोळमध्ये ५ ते १० रुपये जुडी, तर होलसेलमध्ये चांगल्या दर्जाच्या पालेभाज्या ५०० रुपयाला एक गोणी मिळत आहे. ८० ते १०० रुपये गाजर तर होलसेलमध्ये २०० रुपयांना अडीच किलो, फरसबी ४० रुपये किरकोळमध्ये तर होलसेलमध्ये ३२ रुपयांनी, किरकोळमध्ये फ्लॉवर ५० ते ६० रुपये किलो तर होलसेलमध्ये ३२ ते ४० रुपये किलाेने मिळत आहे. फळांमध्ये संत्री आणि कलिंगड वगळता इतर फळे महागच असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.
डाळींचे भाव स्थिर
तूरडाळ दिवाळीत होलसेलमध्ये ११० ते किरकोळमध्ये १२० रुपये किलो झाली होती. ते भाव अद्याप कायम आहेत. दिवाळीनंतर जवळपास सर्वच डाळींचे भाव स्थिर आहेत. तेलाचे भावही अद्याप चढेच असून इतर वस्तूंच्या भावातही किरकाेळ बदल झालेला आहे.
भाज्या महाग
१२० ते २०० रुपये किलो असलेली मटार आता ८० ते १०० रु. किलोने किरकोळ बाजारात, तर होलसेल बाजारात ७० रुपये किलोने तर ४० ते ५० रुपयांनी मिळणारी काकडी किरकोळमध्ये ३० रुपये किलो, तर होलसेलमध्ये २० ते २२ रुपये किलोने मिळत आहे.
संत्री, कलिंगड स्वस्त
होलसेलमध्ये आठ डझन संत्री १००० ते १२०० रुपयांवरून ६०० ते ८०० रुपयांना मिळत आहे. किरकोळमध्ये १५० ते २०० रु. किलोने मिळत आहे. किरकोळमध्ये ४० रु. किलोने मिळणारे कलिंगड २५ रुपयांना मिळत आहे.