ठाणे : अनाधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात जांभळी नाक्यावरील तब्बल ३५० होलसेल भाजी विक्रेत्यांनी एल्गार पुकारला आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे अनाधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी येत्या १५ एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलन पुकारले आहे. महापालिका प्रशासनाला जाग यावी आणि आमची होणारी उपासमार बंद व्हावी, या उद्देशाने नाईलाजास्तव हे बंदचे हत्यार उपसावे लागत असल्याची माहिती येथील भाजी विक्रेत्यांनी दिली आहे.
मागील ४५ ते ५० वर्षापासून जांभळी नाका येथे छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता संघ आणि जिजामाता फळ भाजी सेवा संघाच्या माध्यमातून येथील ३५० अधिकृत भाजी विक्रेते व्यवसाय करीत आहेत. मात्र मागील काही महिन्यापासून किंबहुना वर्षभरापासून याच भागातील रस्त्यांवर अनाधिकृतपणे बसणाºया फेरीवाल्यांचा त्रास आता या भाजी विक्रेत्यांना होऊ लागला आहे. कोरोनाच्या काळात काही भाजी विक्रेत्यांनी तसेच फेरीवाल्यांना हलविण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यात येथील अनाधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत चालली आहे.
तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जांभळी नाका ते स्टेशन रोड हा बाजारपेठेतील रस्ता वाहतुकीसाठी असेल त्यादृष्टीने रुंदीकरण केले होते. मात्र आजच्या घडीला पहाटे साडेतीन ते अगदी सकाळी १० वाजेपर्यंत येथे शेकडो अनाधिकृत फेरीवाले बसलेले असतात. या फेरीवाल्यांच्या विरोधात पालिका प्रशासन, स्थानिक पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे देखील येथील अधिकृत भाजी विक्रेता संघाच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही त्यावर कारवाई झाली नसल्याचा मुद्दा येथील भाजी विक्रेत्यांनी मांडला आहे.
येथील अनाधिकृत फेरीवाल्यांकडून हप्ते जात असल्याने देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप येथील भाजी विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचेही त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे बंदचे हत्यार उपसावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिकृत भाजी विक्रेत्यांची या अनाधिकृत फेरीवाल्यांमुळे उपासमार सुरु झाली आहे. वारंवार तक्रारी करुनही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने अखेर आम्हाला बंदचे हत्यार उपसावे लागत आहे. आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.- जय चोंढकर - उपाध्यक्ष, छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ