वासिंद : काळूनदीतील पाणी कमी झाल्याने तसेच ऐन उन्हाळ्यात पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील सोडण्यात येणारे पाणी अद्यापही नदीपात्रात न सोडल्याने येथील शेतकऱ्यांचा लागवड केलेला भाजीपाला पाण्याअभावी सुकू लागला असून जनावरांचाही पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातील पाणी सोडावे अशी मागणी होत आहे.
शहापूर व मुरबाड तालुक्यातील गेगाव नांदवळ, शेळवली, शिंदीपाडा, मानिवली, भादाणे, कोलठण, अल्याणी आदी गावपाड्यांवरील या भागात सध्या मोठ्या प्रमाणात शेकडो एकरात भेंडी, कारली, मिरची, काकडी इतर भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी काळूनदीतील पाण्याचा वापर केला जातो. परंतु सध्या कडाक्याच्या उन्हात नदीतील पाणी कमी झाले आहे. तसेच लागवडीसाठी दरवर्षी या ठिकाणी असलेल्या पारेला, वेहळोली, मानिवली या बंधाऱ्यांतील पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. परंतु यंदा बंधाऱ्यांतील पाणी अद्याप सोडले नसल्यामुळे येथील भाजीपाल्यासाठी पाण्याची कमतरता जाणवत आहे.
याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, शेतकऱ्यांचा भाजीपाला व जनावरांचा पाणीप्रश्न लक्षात घेता संबंधित विभागांनी त्वरित बंधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी मागणी आगरी सेना ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंदाडे, सरचिटणीस कृष्णा परटोले, लहू डोंगरे यांनी केली असून अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.