कल्याण : केडीएमसीने केलेले लॉकडाऊन उठताच मंगळवारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (एपीएमसी) खरेदी-विक्री सुरू झाली. मात्र, केडीएमसी व पोलिसांनी कारवाई न केल्याने बाजार समितीच्या आवाराबाहेरच भाजीपाल्याच्या गाड्या उभ्या करून त्याची विक्री झाली. त्याचा फटका बाजार समितीमधील खरेदी-विक्रीला बसला आहे.
लॉकडाऊनमध्येही २४ मार्चपासून एपीएमसी सुरू होती. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने तेथील बाजाराचे केडीएमसी हद्दीत आठ ठिकाणी विकेंद्रीकरण करण्यात आले. किरकोळ खरेदी-विक्रीवर बंधने आणत केवळ घाऊक खरेदी-विक्रीला मुभा दिली होती. परंतु, वाढत्या रुग्णांमुळे केडीएमसीने २ ते १९ जुलैपर्यंत पुन्हा कडक लॉकडाऊन घेतल्याने एपीएमसीही बंद ठेवण्यात आली. मात्र, मंगळवारपासून पहाटे ५ ते सायंकाळी ५ दरम्यान खरेदी-विक्रीला परवानगी दिली गेली आहे.
एपीएमसीमध्ये मंगळवारी पहाटे ५ पासून बाजार समितीच्या आवारात खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. मात्र, त्याआधीच मध्यरात्री १२ वाजल्यापासून नाशिक, अहमदनगर, पुणे येथून भाजीपाल्याच्या गाड्या कल्याण एपीएमसीच्या परिसरात दाखल झाल्या होत्या. पहाटे बाजार सुरू होण्यापूर्वीच या गाड्यांमधील माल संबंधितांनी रस्त्यावरच विकण्यास सुुरुवात केली.
परिणामी गाड्या बाजार समितीच्या आवारात न गेल्याने तेथील खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला फटका बसला. दरम्यान, रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांवर पोलीस व केडीएमसीने कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. तसे झाले तरच एपीएमसीतील व्यवहाराला तेजी प्राप्त होईल, याकडे एपीएमसीचे उपसचिव यशवंत पाटील यांनी लक्ष वेधले.
एपीएमसीचे सचिव श्यामकांत चौधरी म्हणाले की, मंगळवारी पहिल्याच दिवशी विविध ठिकाणांहून शेतमालाच्या ७० गाड्या आल्या होत्या. त्यातून दोन हजार क्विंटल भाजीपाला, एक हजार ३०० क्विंटल कांदा-बटाटा आणि ७०० क्विंटल अन्नधान्याचा माल आला आहे.पहाटे ५ पासून किमान ५० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. एपीएमसीत एकूण ६०० गाळे असून, त्यापैकी २५० गाळे एक दिवसाआड उघडून व्यवहार करण्यास मुभा दिली आहे.
किरकोळ विक्रेत्यांना दिलासा, श्रावण महिन्यामुळे भाजीपाला महागण्याची शक्यता
कल्याण एपीएमसी सुरू झाल्याने किरकोळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा त्यांना नवी मुंबई एपीएमसीत स्वत:चे वाहन घेऊन जावे लागत होते. वाहतूक खर्च व मालाची विक्री किंमत याचा ताळमेळ घालावा लागत होता. त्यामुळे जुलैमधील लॉकडाऊनच्या काळात केडीएमसी हद्दीत जास्तीच्या दराने भाजी विकली गेली. मंगळवारपासून श्रावण सुरू झाल्याने अनेकांचा भाजीपाला सेवनावर जास्त भर असणार आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.