ठाणे : हिवाळ्यात पालेभाज्यांचे भाव काहीसे उतरतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळतो. मात्र, यंदा नोव्हेंबरअखेरपासूनच तीव्र पाणीटंचाईची झळ बसून पालेभाज्यांची आवक ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याने २५ ते ३0 टक्के भाववाढ झाली आहे. कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीचा भाव उच्चांकीस्तरावर पोहोचला आहे. थंडीचा कडाका वाढल्याने टोमॅटो लवकर पिकत नाहीत. त्यामुळे आवक घटल्याने भाव वधारले आहेत, असे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.थंडी पडू लागली की, भाज्यांची आवक वाढून भाव घसरतात. मात्र, यंदा कमी पावसामुळे नोव्हेंबरपासूनच पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम होऊन ऐन थंडीत पालेभाज्यांचे भाव वधारल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत आहे. मार्गशीर्ष महिना असल्याने त्याची तीव्रताही जाणवत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात भाजीपाल्याचे भाव आणखी वधारण्याची शक्यता भाजीविक्रेते संभाजी खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे टोमॅटो लवकर पिकत नसल्याने शेतकरी बाजारात कमी प्रमाणात माल पाठवत आहेत. त्यामुळे टोमॅटोचे भाव २० ते २५ रुपयांवरून ३० ते ४० किलो रुपयांवर पोहोचला आहे, असे भगवान तुपे यांनी सांगितले. वाटाणा स्वस्त झाला असून २० ते २५ रुपये किलोने मिळत आहे. सध्या ठाण्याच्या बाजारपेठेमध्ये नाशिक, पुणे या भागांतून भाज्यांची आवक होत असून पालेभाज्यांची आवक ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
पालेभाज्या, टोमॅटोने थंडीतही फोडला घाम; आवक घटल्याने दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 4:15 AM