ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील पारदर्शक कारभार चालण्यासाठी परिवहन प्रशासनाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिकाऊ परवाना प्रणालीपाठोपाठ आता परवान्यांसंबंधित पैसेही भरण्यासाठी ‘सारथी’ प्रणाली ठाण्यात सोमवारी कार्यान्वित केली आहे. यामुळे तासन्तास रांगेत उभे राहावे लागणाºयांना आता घरबसल्या २४ तासांत कधीही पैसे भरता येणार आहेत. या प्रणालीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसणार आहे. त्याचबरोबर या संबंधित कामासाठी दिवसा जमा होणाºया रकमेपेक्षा आता दुपटीने रक्कम जमा होऊ लागल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या मर्फी कार्यालयात नोव्हेंबर २०१६ मध्ये शिकाऊ परवाना प्रणालीला सुरुवात झाली. त्याच धर्तीवर सारथी ही नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीनुसार, नवीन परवाना असो वा बनावट परवाना किंवा त्याचे नूतनीकरण असो. तसेच इतर परवान्यांसंबंधित कामांचे पैसे आता आॅनलाइन भरावे लागणार आहे. यामुळे पूर्वीप्रमाणे ठाणे आरटीओच्या मर्फी कार्यालयात जाऊन पैसे भरण्यासाठी जरी चार खिडक्या सुरू असल्या तरी, पैसे भरण्यासाठी त्यावर नेहमीच गर्दी पाहण्यास मिळत होती. यामुळे रांगेत तासन्तास उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. अथवा, दलालांना पैसे देऊन ही कामे क रून घ्यावी लागत होती. त्याचबरोबर त्या चार खिडक्यांवर दिवसाला सुमारे दीड लाख रुपये जमा होत होती. परंतु, आॅनलाइन प्रणाली सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी सुमारे तीन ते साडेतीन लाख, तर दुसºया दिवशी साधारणत: चार लाख रुपये जमा झाल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली. या प्रणालीमुळे पैसे भरण्यासाठी खर्च होणारा वेळ आणि होणारे हेलपाटेही कमी होणार आहेत. मात्र, हे सर्व्हर धीम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांसाठी ते त्रासदायक ठरण्याची भीतीही आहे. ही गैरसोय टाळण्याची काळजी प्रशासनाने घ्यावी.
वाहन परवान्यांचे पैसेही भरा आॅनलाइन , चार खिडक्यांवरील रांगांना पूर्णविराम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:41 AM