ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरोसा सेलच्या मोटारकारला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने कारमधील भरोसा सेलच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक जयमाला वसावे आणि त्यांचे चालक सचिन झगडे हे या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी, तसेच रोझा गार्डनिया सोसायटीतील रहिवाशांनी ही आग अर्ध्या तासाने आटोक्यात आणली.
वसावे या चालक झगडे यांच्यासह ठाण्यातील भरोसा सेलच्या कार्यालयातून सायंकाळी निवासस्थानी गेल्या होत्या. तिथून त्या याच कारने पुन्हा अन्य एका ठिकाणी कार्यालयीन कामासाठी जाण्यासाठी निघाल्या होत्या. रोझा गार्डनिया सोसायटीच्या प्रवेशद्वारातून त्यांची कार बाहेर पडत असतानाच डॅशबोर्डमधून धूर येत असल्याचे आढळले. त्यामुळे चालकासह वसावे या बाहेर पडल्या. त्यानंतर, काही वेळातच या कारने पेट घेतला. प्रसंगावधान राखून सोसायटीतील रहिवाशांनी अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच, ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी ७ ते ७.३० वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आली. मात्र, या आगीत कारचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.