लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एका भाजीच्या ट्रकमधून तब्बल ४० प्रवाशांची वाहतूक करणा-या शिवराज जयस्वाल (३४, रा. शिवडी, मुंबई, ट्रकचा मालक) आणि मुसफ्फर बेग (३२, रा. कुभारवाडा, मुंबई, चालक) या दोघांविरुद्ध कोपरी पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन तसेच संचारबंदी कलम १८८ नुसार कारवाई करुन गुन्हा दाखल केला. तसेच त्याने आणलेल्या प्रवाशांच्या जेवणाचीही शुक्रवारी दुपारी सोय केली.ठाण्यात राहणारे मुळचे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या रहिवाशांना नाशिक येथे जायचे होते. त्यांना जयस्वाल आणि बेग यांनी काही पैशांमध्ये नाशिकला सोडण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार २६ मार्च रोजी रात्री १० वाजता ट्रकच्या समोरील भागात भाजी तर मागी रिकामे कॅरेट आणि कॅरेटच्या आतील भागात हे ४० प्रवाशी घेऊन हा ट्रक निघाला. परंतू, नाशिकच्या अलिकडेच नाकाबंदी पाहून ते परत फिरले. हाच ट्रक २७ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोपरी पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये मुंबई ठाणे पूर्व दू्रतगती मार्गावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर यांच्या पथकाने पकडला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. चौकशीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये या सर्व प्रवाशांना जेवणही मिळाले नसल्याचीही बाब समोर आली. तेंव्हा चालक आणि मालकावर कायदेशीर कारवाई केल्यानंतर ट्रकमधील सर्व प्रवाशांच्या जेवणाची सोय आगरकर तसेच पोलीस निरीक्षक दत्ता गावडे, सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे आणि उपनिरीक्षक दिपाली लंबाते स्वखचातून केली.दरम्यान, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर राहणाºया सुमारे ४० कामगारांच्या जेवणाची सोय सिडको बस स्टॉप येथे केली. या कामगारांनीही समाधान व्यक्त केले.