ठाणे : वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यांवर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करण्यास मनाई आहे. धबधब्यांच्या एक किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी, चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेशास ८ जूनपासून पुढील आदेश होईपर्यंत मनाई केली आहे.
हे कृत्य केल्यास होईल कारवाई
धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपानास मनाई असून मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्यवाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री, उघड्यावर मद्यसेवन, वाहतुकीचे रस्ते, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे आदींस मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या - प्लास्टिकच्या बाटल्या व थर्माकॉलचे व प्लास्टिकचे साहित्य इतरत्र फेकणे, महिलांची छेडछाड, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य हावभाव व शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करण्यास मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, गाडीमधील स्पिकर, उफर वाजवून ध्वनिप्रदूषण करणे, ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे.