ठाणे: दारुच्या नशेमध्ये वाघबीळ येथील वाहने जाळणा-या मोहम्मद सुनोवर अन्वर सैय्यद (१९, रा. गोंडा, उत्तरप्रदेश) याला कासारवडवली पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये मंगळवारी जेरबंद केले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.कासारवडवली, वाघबीळ येथील रहिवाशी प्रमोद तायडे यांनी ६ आॅगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटारसायकल वाघबीळ उड्डाणपुलाखाली उभी करुन कामावर निघून गेले होते. ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास परतले तोपर्यंत त्यांच्या दुचाकीसह तिथूच बाजूला असलेल्या अन्य दोन मोटारसायकलींना अज्ञात व्यक्तीने आगी लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक प्रदीप उगले आणि सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी केलेल्या चौकशीतून सैय्यदचे नाव समोर आले. सय्यद कामाच्या शोधार्थ ५ आॅगस्ट रोजीच उत्तरप्रदेशातून ठाण्यात आला होता. वाघबीळ उड्डाणपूलाखाली तो बसलेला असतांना एका मोटारसायकलीचे पेट्रोल गळत असल्याचे त्याला दिसल्यानंतर त्याने काडी पेटवून ती दुचाकीतून पडणा-या पेट्रोलवर टाकली. त्याचवेळी त्या मोटारसायकलने पेट घेतला आणि बाजूच्या इतर दोन मोटारसायकलींनाही आगी लागल्या. दारुच्या नशेतच आपण हे कृत्य केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. मोटारसायकलींनी पेट घेतल्यानंतर मात्र घाबरुन तिथून पळून गेल्याचेही त्याने मान्य केले. घटना घडली तेंव्हा एका कार चालकाने हा प्रकार पाहिला होता, त्यानेच एका पोलिसाला माहिती दिल्यानंतर सय्यदचे नाव उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.