अंबरनाथ : अंबरनाथ तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बेशिस्त पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे. मिळेल तेथे वाहन उभे करून चालक निघून जात असल्याने वाहने अडकून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक कार बाहेर काढण्यासाठी हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करतात. या बेशिस्त वाहन पार्किंगवर तोडगा काढण्याची गरज आहे.
तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविणे प्रशासनाला अवघड जात आहे. तहसीलदार कार्यालयातच दस्त नोंदणी कार्यालय असल्याने दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने या ठिकाणी येतात. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहनांची या ठिकाणी पार्किंगसाठी चढाओढ सुरू असते. त्याच वेळेत कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची वाहनेदेखील येतात. मात्र, वाहनांची गर्दी झाल्याने शासकीय वाहनांनादेखील येण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. एवढेच नव्हे तर काही बेशिस्त वाहनचालक हे मुख्य रस्त्यावरच वाहन पार्क करत असल्याने कार्यालयातील गाडी बाहेर काढण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. अनेक वाहनचालक गाडी रस्त्यावर उभी करून निघून जात असल्याने पर्यायी मार्गच शिल्लक राहत नाही. वाहन बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने अनेक वाहनचालक गाडीचा हॉर्न वाजवत आपला संताप व्यक्त करत असतात. हॉर्नच्या आवाजामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो.
सुरक्षारक्षक नेमण्याची गरजसोमवार आणि गुरुवारी तहसीलदारांकडे शेतजमिनीशी निगडित न्यायालय भरविले जात असल्याने त्यावेळीही अनेक वाहने या ठिकाणी येत असतात. त्यावेळीही वाहने बेशिस्तपणे उभी करण्यात येत असल्याने मोठी गैरसोय होते. सर्वच गाड्या थेट तहसीलदार कार्यालयात येत असल्याने वाहने उभी करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली जात आहे. दुसरीकडे या ठिकाणी येणाऱ्या गाड्यांचे योग्य पार्किंग करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याचीही गरज आहे.