आॅनलाईन लोकमत ठाणे, दि. 17 : खोपट, सिद्धेश्वर तलाव परिसरातील शिवसेना उपविभाग विनोद पाटेकर यांच्या नविन दुचाकीसह सहा वाहनांची जाळपोळ करणाऱ्या रोहन सावंत (२०) आणि हिमांशू उर्फ टिनू नामदेव सावंत (२०, रा. दोघेही नौपाडा, ठाणे) यांना नौपाडा पोलिसांनी अवघ्या १८ तासांमध्ये अटक केली. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचाही शोध सुरु असल्याचे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितले.पाटेकर यांची ‘टेन्डी’ या व्हॉटसअॅप ग्रृपवर बदनामी सुरू होती. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिद्देश्वर तलाव भागात जाऊन बदनामी करणाऱ्या तरुणांना जाब विचारला होता. तसेच काही दिवसांपूर्वी रोहन सावंत यांची दुचाकी कोणीतरी फोडून तिचे नुकसान केले होते. ही गाडी फोडल्याचाही पाटेकर आणि त्यांच्या साथीदारांवर रोहनचा संशय होता. याच संशयातून त्याने ‘सांगणार नाही, करुन दाखवेन,’ अशी धमकी दिली. त्यातूनच त्यांनी पाटेकरच्या दुचाकीचे नुकसान करण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे हिमांशु उर्फ टिनू नामदेव सावंत आणि ओंकार भोसले या दोन साथीदारांच्या मदतीने कशेळी येथे रविवारी पहाटेपर्यंत पार्टी केली. त्यानंतर पहाटे ३.३० वा. त्याने दोघांनाही पाटेकर यांच्या घराजवळ नेले. त्यानंतर त्यांच्या नव्या दुचाकीतील पेट्रोल काढले. तेच त्यांच्या दुचाकीवर टाकून ती पेटवून ते पसार झाले. यात त्यांच्या दुचाकीसह बाजूला असलेली योगिता आंगे्र यांची रिक्षा तसेच अन्यही चार दुचाकी जळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांच्या पथकाला मिळाली. यामध्ये चार लाख ६५ हजारांचे नुकसान झाले. महिला रिक्षा चालक आंग्रे यांनी याप्रकरणी रविवारी पहाटेच्या सुमारास दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, संजय धुमाळ, सहाय्यक निरीक्षक विशाल बनकर यांच्या पथकाने आपल्या खबऱ्यांच्या मदतीने, तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन वाहने जळीत कांडाचा छडा लावला. पहाटेच्या सुमारास रोहन एका दुचाकीवरुन दोन साथीदारांसह आल्याचे सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांना मिळाले. या तिघांचाही शोध सुरु केल्यानंतर ते तिघेही पिकनिकसाठी रायगड येथे गेल्याची माहिती उघड झाली. ते एका खासगी बसमधून रायगड येथून ठाण्याकडे येत असतांना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास कळवा नाका येथे रोहन आणि हिमांशू यांना सापळा लावून नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पाटेकर यांनी त्यांची दुचाकी फोडल्याच्या रागातूनच ओंकार आणि हिमांशू यांच्या मदतीने त्यांची दुचाकी जाळल्याची कबूली त्यांनी दिली. .................दहशत संपविणार - स्वामीओंकार यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. रोहन आणि ओंकार हे सिद्धेश्वर तलाव परिसरात पाटेकर यांची गाडी जाळून आपली दहशत माजविणार होते. या टोळीप्रमाणे कोणीही ठाणे शहरात दहशत माजवित असेल तर थेट आपल्या ९९२२ ९००००४ या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधा, असे आवाहन स्वामी यांनी केले आहे. झोपडपट्टीतील दादा, नाक्यावरचे गुंड, छेडछाड करणारे अशा कोणाचीही तक्रार थेट आपल्याकडे करा. कोणाचीही तक्रार आल्यास संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून अवघ्या दहा मिनिटांमध्ये पोलिसांची मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
वाहने जळीत कांडातील दुकली गजाआड
By admin | Published: July 17, 2017 9:43 PM