- जितेंद्र कालेकर, ठाणे पोलीस अधिकारी गळक्या वास्तूमध्ये तक्रारी नोंदवित आहेत. मुद्देमालाचा कक्ष आणि आरोपींच्या कोठडीलाही प्लॅस्टिकचे छत लावले आहे. असा गैरसोयींनी युक्त वर्तकनगर पोलीस ठाण्याचा कारभार सुरू आहे. ३६ वर्षे जुन्या या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा आता पुनर्विकास करण्याची गरज असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.काही वर्षांत वर्तकनगर, शिवाईनगर आणि वसंतविहार या परिसरांचा झपाट्याने विकास झाला. अनेक झोपडपट्ट्यांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. पूर्वी कामगार आणि झोपडपट्टीबहुल परिसर असलेल्या या पोलीस ठाण्याची निर्मिती १९७९ मध्ये झाली. निर्मितीपासूनच म्हाडा वसाहतीमधील जागेत हे पोलीस ठाणे आहे. आता वरिष्ठ निरीक्षक आणि गुन्हे निरीक्षक यांचे कक्ष वगळता उपनिरीक्षकांच्या कामकाजाचे ठिकाण धोकादायक अवस्थेत आहे. पोलिसांना १५ ते १६ तासांची ड्युटी करावी लागते. त्यांचा सर्वाधिक वेळ ठाण्यात जातो. तिथे कामकाजाची जागाच पोषक नसेल तर ते कार्यक्षमतेने कसे काम करणार, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. पोलीस कोठडी, हत्यारे रूम, मुद्देमाल आणि कारकून कक्षाला तर प्लॅस्टिकचे छत लावले आहे. महिला आरोपींना वागळे पोलीस ठाण्यात ठेवावे लागते. कोठडी ही नावालाच आहे. त्यामुळे अक्षरश: डोळ्यांत तेल घालूनच पहारा द्यावा लागतो. कैदी तरी सुरक्षित राहतील, अशी प्रशस्त जागा पोलीस ठाण्याला अपेक्षित आहे, ती येथे नाही. पोलीस ठाण्यात सफाई कामगाराची नियुक्ती नाही. त्यामुळे ती कामगिरीही पोलिसांनाच पार पाडावी लागते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांच्यासह दोन निरीक्षक, २ सहायक निरीक्षक, ७ उपनिरीक्षक यांच्यासह ११५ कर्मचाऱ्यांची मंजुरी या पोलीस ठाण्याला मिळाली आहे. प्रत्यक्षात गावित हे एकमेव निरीक्षक सध्या असून ४ एपीआय आणि ३ उपनिरीक्षक आहेत. आणखी दोन निरीक्षक आणि ५ उपनिरीक्षक तसेच ५० ते ६० कर्मचाऱ्यांची गरज आहे. बीट क्र. १ - वर्तकनगर, बीट -२- येऊर, ३- लोकमान्यनगर, ४ गांधीनगर, असा मोठा परिसर ४ किमी.मध्ये व्यापलेला आहे. १२ लाखांच्या लोकसंख्येची कायदा सुव्यवस्था हाताळणारे पोलीस या गैरसोयींमुळे हताश आहेत.
वर्तकनगर पोलीस ठाण्याचा कारभार गळका व फुटका
By admin | Published: July 30, 2015 12:34 AM