लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गरीब आणि गरजूंच्या उपचारांबरोबरच कोविड केंद्रे व रुग्णालयांमध्ये मोठ्या ऑक्सिजन सिलिंडरच्या निरंतर पुरवठ्याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. मनसेचे शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे यांनी केडीएमसीला स्वखर्चातून दिलेल्या दोन व्हेंटिलेटर मशीन सध्या धूळखात पडून आहेत. त्यांचा उपयोग गरजू व गरिबांवर उपचारासाठी व्हावा, अशी मागणी होत आहे.
केडीएमसीसाठी पीएम केअर योजनेच्या फंडातून पुरवलेल्या सदोष व्हेंटिलेटर मशिन्सचा घोटाळा एका अहवालातून चव्हाट्यावर आला आहे. मात्र, सुस्थितील व्हेंटिलेटरचा वापर करण्यात वैद्यकीय आरोग्य प्रशासन कुचकामी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांचे एका निवेदनाद्वारे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.
मनपा हद्दीत कोरोना रुग्ण तसेच मृतांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांच्या उपचारात कमतरता होऊ नये, यासाठी म्हात्रे यांनी सात लाख खर्चून दोन्ही मशिन्स मागविल्या. स्वीडन बनावटीच्या दोन ॲडव्हान्स एनआयव्ही व्हेंटिलेटर मशिन्स सर्वसामान्यांच्या उपचारासाठी १० जुलै २०२० ला शास्त्रीनगर रुग्णालयाला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्या होत्या. १० महिने या मशिन्सचा रुग्णांसाठी वापर करण्यात आला. मात्र, देखभाल-दुरुस्तीच्या वेळी या मशिन्स शास्त्रीनगर रुग्णालयात न आढळल्याचे देखभाल-दुरुस्तीसाठी गेलेल्या कंपनीच्या मेकॅनिककडून समजले. त्यामुळे १० दिवसांपासून या मशिन्सचा शोध घेण्यात आला. या मशिन्स शास्त्रीनगर रुग्णालयात असल्याचे समजल्यानंतर मेकॅनिकने त्यांचे सर्व्हिसिंग केले. ऑक्सिजनचे मोठे सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने या मशिन्सचा वापर होत नाही, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या रुग्णालयात मोठ्या ऑक्सिजन सिलिंडरचा निरंतर पुरवठा करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी म्हात्रे यांनी निवेदनात केली आहे.
---------------