अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाचे दोन डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची अनुमती देण्यात आली. या नागरिकांना रेल्वे पास मिळणे सुकर व्हावे यासाठी त्यांच्या कोविड लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, कोपर, टिटवाळा, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली या रेल्वेस्थानकांवर महापालिकेने सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत दोन सत्रांत महापालिका कर्मचाऱ्यांचे मदत कक्ष उभारले आहेत. त्याचा बुधवारपासून आतापर्यंत सुमारे ११ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यांना पडताळणी आणि पास काढायला अडचण आली नसल्याचे एकूणच चित्र हाेते.
महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वेस्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी उपस्थित आहेत. या पहिल्या सत्रात कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वेस्थानक, डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वेस्थानक ठाकुर्ली, शहाड, आंबिवली, कोपर, टिटवाळा रेल्वेस्थानक आदी ठिकाणी पहिल्याच दिवशी दाेन हजार ५०६ नागरिकांची लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार चार दिवसांत सुमारे ११ हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. दुपारच्या दुसऱ्या सत्रातही नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही केंद्रावर गर्दी आढळून येत नाही. लसीकरणाची गती मंदावली असल्याने दुसऱ्या डोसनंतर १४ दिवस अशी अट असल्याने टप्प्याटप्प्याने गर्दी वाढणार आहे. पहिल्या दिवशी फक्त काहीसा गोंधळ दिसून आला, त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनी वेगाने काम करत पडताळणी पद्धत सोपी केली.
----------
काटेकाेर तपासणी सुरू
- नागरिकांना आधारकार्ड आणि कोविडच्या दुसऱ्या डोससंदर्भात प्रमाणपत्र या कागदपत्रांची झेरॉक्स सोबत न्यावी लागत आहे. त्याची पाहणी करून बारकोड स्कॅनिंग करून व्यक्तीचे आधारकार्डवरील नाव, अन्य माहिती तपासली जात आहे. झेरॉक्स नसेल तर त्या व्यक्तीला सेवा मिळत नाही.
- १४ दिवस झाले की नाही, हेदेखील तपासले जात आहे. त्यानंतर कागदपत्रांवर मनपा शिक्का मारून संबंधित व्यक्तीचा पडताळणी क्रमांक नोंद करत आहे. ते कागदपत्र रेल्वेच्या तिकीट घरात असलेल्या क्लार्कला दाखवून पास घेणे अशी सुटसुटीत प्रक्रिया आहे.
- मध्य रेल्वेवरदेखील सामान्यांना अटीशर्थीची पूर्तता केल्यावर पहिल्या दिवशी बुधवारी सुमारे १२ हजार प्रवाशांनी ठिकठिकाणी मासिक पास काढला होता. चार दिवसांत तेच प्रमाण गृहीत धरले तरी आतापर्यंत सुमारे ५० हजार नागरिकांनी मासिक पास काढला आहे. सध्याच्या सुमारे १५ लाख प्रवाशांत ५० हजारांची भर पडणार आहे.
------------