- जान्हवी मोर्ये डोंबिवली : मनातील गोष्टी सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा असावी, असे ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच वाटते. पण, शहरात अशी जागा त्यांना मिळत नाही. परिवर्तन महिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पाटकर यांनी अशीच हक्काची जागा ज्येष्ठांना मिळावी, यासाठी ‘जननी आशीष’ या संस्थेत विरंगुळा केंद्र सुरू केले आहे.ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. आपल्यासारखेच समवयस्क या केंद्रात येणार असल्याने त्यांना व्यक्त होण्याची संधीही मिळणार आहे. या कें द्रात कॅरम, बुद्धिबळ, वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. काही ज्येष्ठांना वयोमानानुसार वाचण्यात अडचणी येतात. त्यांना ई-रीडिंगची सुविधाही येथे असणार आहे. त्यामुळे त्यांना वाचनाची आवड जोपासता येईल. ज्या ज्येष्ठांना आपल्याकडील कला इतरांना शिकवण्याची इच्छा असेल आणि त्यांना तसा विद्यार्थिवर्ग मिळाल्यास या कट्ट्यावर ते प्रशिक्षणही देऊ शकणार आहेत. त्यामुळे या केंद्रात ज्येष्ठांना आपले छंद जोपासता येणार आहेत. ‘जपू या परंपरा’ या गु्रपतर्फे ३५ महिला एकत्रित येऊन आजी संमेलन भरवतात. या संमेलनाची तालीम करण्यासाठी त्यांना ही जागा उपलब्ध करून देण्याचे काम येथे केले जाणार आहे, अशी माहिती पाटकर यांनी दिली.पाटकर म्हणाल्या, वृद्धांनी वृद्धांसाठी चालवलेले हे केंद्र असणार आहे. या केंद्रात सर्वसुविधा ज्येष्ठांना विनामूल्य पुरवल्या जाणार आहेत. संस्थेने या केंद्रासाठीची जागा तीन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे. हे विरंगुळा केंद्र कसे असावे, यासाठी काही महिन्यांपूर्वी एक सेमिनार घेतले होते. त्यातून काही सूचना आल्या. त्यानुसार, विरंगुळा केंद्राचा आराखडा ठरवण्यास मदत झाली.ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या ‘फेस्कॉम’ संस्थेकडून काही प्रश्न आल्यास ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एखाद्या व्यक्तीला वकिलाची फी देण्याची आर्थिक परिस्थिती नसेल, तर त्यांना मोफत सल्ला दिला जाणार आहे. संस्थेत दोन समुपदेशक असणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडेही खूप कलागुण आहेत. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना यानिमित्ताने वाव मिळणार आहे. सर्वांच्या विचारातून हे केंद्र चालवण्यात येणार आहे. ज्येष्ठांसाठी योग व प्राणायामवर्गही येथे होणार आहे. त्यासाठी योग प्रशिक्षक मंगला ओक सहकार्य करणार आहेत. आॅर्थोपेडिक डॉ. प्रसाद भंडारी हे म्युझिक थेरपी शिकवणार आहेत. त्यांच्या कार्यशाळा येथे होणार आहेत.कमिटीची स्थापनाविरंगुळा केंद्रातर्फे एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. ही कमिटी ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ज्येष्ठांना वेळप्रसंगी पोलीस ठाण्यात जावे लागते. तेथे जाण्यासाठी कमिटी सहकार्य करणार आहे.
डोंबिवलीमध्ये ज्येष्ठांना मिळाले हक्काचे विरंगुळा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:41 AM