उल्हासनगर : आरक्षित भूखंडाऐवजी चक्क शाळेचे मैदान व झोपडपट्टीवर कबरस्तान दाखवण्यात आले आहे. बिल्डर, धनदांडगे व अधिकारी यांच्या हातचलाखीची ही जादू असल्याची खिल्ली विरोधी पक्षांनी उडवून शिक्षकांसह विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.उल्हासनगरचा तब्बल ४३ वर्षानंतर शहर विकास आराखडा मंजूर झाला. सुरूवातीला नवीन विकास आराखडयामुळे शहर विकास साधले जाणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती. मात्र एका आठवडयात विकास आराखडयाची पोलखोल सुरू झाली. बिल्डर धार्जिणा विकास आराखडा मंजूर झाल्याची टीका शिवसेनेसह रिपाइ, काँगे्रस, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी, साई पक्षाने केली. महासभेने मंजूर केलेल्या विकास आराखडयात नागरिकांच्या हरकती व सूचनांचा विचार केला नसल्यानेच अशा चुका झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.सरकारकडे पाठवलेल्या विकास आराखडयात म्हारळ गाव शेजारील आरक्षित भूखंड व कॅम्प नं-५ येथील भूखंडावर नियोजित कबरस्तान दाखवण्यात आले होते. मात्र मंजूर झालेल्या शहर विकास आराखडयात चक्क शाळेचे मैदान व झोपडपट्टीच्याठिकाणी कबरस्तान दाखवले आहे.विकास आराखडयात कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील आरक्षण क्रमांक १५५ मध्ये कबरस्तान दाखवले आहे. मातोश्री रमाबाई आंबेडकर मराठी शाळेचे मैदान व शेजारील झोपडपट्टी आरक्षण क्रं-१५५ मध्ये येते, अशी प्रतिक्रीया अभियंता कुमार जग्यासी यांनी दिली. शाळेच्या मैदानात कबरस्तान होणार या भीतीने पालक, विद्यार्थी, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून या मराठी शाळेत बालवाडी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मुख्यमंत्र्याकडेमागणार न्यायशाळेच्या मैदानावर कबरस्तान मंजूर झाले असेल तर विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालणार आहेत, असे शाळा संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक महादेव सोनावणे यांनी सांगितले.आराखड्याचीआज देणार माहितीमहापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी गुरूवारी महासभा हॉलमध्ये बैठक बोलावली आहे. यात आराखडयाची माहिती आराखडा बनवणारी अहमदाबाची सेफ्ट कंपनी देणार आहे. नगरसेवक, पत्रकार, सामाजिक संस्था, अधिकारी यांना निमंत्रित केले असून शिवसेनेने विकास आराखडयाबाबत विशेष महासभा बोलावण्याची मागणी केली आहे.
शाळेच्या मैदानात चक्क कबरस्तान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:31 AM