ठाणे : ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे लोकार्पण आणि रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. असे असताना कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामांचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत’, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट केली.
ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आ. जितेंद्र आव्हाड असा सामना गेल्या काही दिवसांपासून रंगला आहे. असे असतानाच कळव्यातील कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. २०१७ साली मिलिंद पाटील हे विरोधी पक्षनेते असताना कळवा खाडीकिनारी सुशोभीकरण प्रकल्पाच्या संचालक मंडळात असल्याने कळव्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला होता. हे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. सगळ्या नगरसेवकांनी बैठक घेऊन याचे उदघाटन करण्याचे ठरवले होते. पण, पाटील आजारी असल्याने उदघाटन करता आले नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत. फक्त जनतेच्या माहितीसाठी की, कळव्यातील कामे कशी व्यवस्थित होत आहेत आणि त्याचाच आम्हाला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी व्यक्त केली.