डोंबिवली : ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर (८३) यांचे वृद्धापकाळाने बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा राम व दोन नातू आहेत. कोल्हटकर यांच्या जाण्याने डोंबिवलीतील नाट्यचळवळीचा आधारस्तंभ हरवल्याची भावना नाट्यक्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.कोल्हटकर यांना लहानपणापासूनच नाटकांची आवड होती. पोद्दार महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर मुंबई साहित्य संघ व सायं मित्र मंडळातर्फे होणाऱ्या नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. विशेष म्हणजे मामा पेंडसे यांच्याबरोबर ‘भाऊबंदकी’मध्ये रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका केली. १९६६ ते ७१ पर्यंत रघुवीरनगर, पाटणकरवाडी येथे झालेल्या नाटकात सुहासिनी अभ्यंकर यांच्याबरोबर ‘येथे जन्मली व्यथा’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्या नाटकास पहिले पारितोषिक मिळाले. त्याचवेळी चारुदत्त मित्र मंडळातर्फे राम गणेश गडकरी यांच्या पुण्यप्रभाव, राजसंन्यास यासारख्या जुन्या व दर्जेदार नाटकांत भूमिका केल्या. ‘आम्हाला हाच मंत्री हवाय’ या नाटकातील रामचंद्र अमात्य यांची भूमिका त्यांनी केली.लोकसेवा मंडळ स्पर्धेतील ‘तुझे आहे तूजपाशी’ नाटकात सतीशची भूमिका त्यांनी केली होती. त्या स्पर्धेत त्यांना तीन प्रशस्तीपत्रके मिळाली होती. तरु ण वयात त्यांनी डोंबिवलीतील गुरु दत्त मित्र मंडळात प्रवेश केला. या संस्थेच्या माध्यमातून शहरातील नवोदित कलाकारांना त्यांनी एकत्र आणले जात होते. शहरात नाट्यचळवळ रु जावी, यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करतानाच त्यांनी ‘सहलीला सावली आली’, ‘अर्ध्याच्या शोधात दोन’ यासारख्या प्रायोगिक नाटकांत अभिनय केला. ‘सहलीला सावली आली’मधील त्यांची भूमिका गाजली होती. अभिनयासह कलाकारांना मार्गदर्शन करत नाट्यचळवळ रुजवणे यांची धुरा त्यांनी पेलली होती. तसेच नलिनी जोशीसोबत त्यांनी संगीत नाटकात भूमिका केली होती.दरम्यान, काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते. त्यांच्या निधनामुळे शहरातील सांस्कृतिक वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे.नोकरीमुळे व्यावसायिक नाटकांपासून दूरखाजगी क्षेत्रात नोकरी स्वीकारल्याने ते व्यावसायिक नाटकांकडे वळले नाहीत. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ते नाट्यचळवळीत सक्रि य होते. शहरातील अनेक संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. नाट्य, साहित्य यासारख्या प्रत्येक कार्यक्र माला आवर्जून हजेरी लावत. राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणाची धुराही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.
ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र कोल्हटकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:11 AM