ठाणे : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील नेते, प्रख्यात पत्रकार ‘मराठा’कार आचार्य अत्रे यांच्या पत्रकारितेतील एक साक्षीदार आणि साथीदार असलेले पत्रकार, लेखक बाबुराव सरनाईक अर्थात बाबूजी यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात विलास आणि आ. प्रताप सरनाईक ही दोन मुले, मुलगी प्रतिभा, सून नगरसेविका परिषा तसेच विहंग आणि नगरसेवक पूर्वेश ही नातवंडे असा परिवार आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा जवळून अनुभवणारे आणि या लढ्याचे साक्षीदार असलेले एक लढवय्या व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे आचार्य अत्रेंचा एक साक्षीदार हरपल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.साहित्य, पत्रकारिता ते ज्योतिषशास्त्र अशा सर्व क्षेत्रांत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. शरीराने थकलेल्या बाबूजींचे विचार आणि मन मात्र तरु ण होते.‘हा कुंभ अमृताचा’ हे आत्मचरित्र आणि आचार्य अत्रेंच्या जीवनावर आधारित ‘तो एक सूर्य होता’ तसेच ‘कोरांटीची फुले’, ‘ज्योतिषशास्त्र एक दिव्य दृष्टी’ आणि ‘स्वप्न साक्षात्कार’ ही त्यांची पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. ‘हा कुंभ अमृताचा’ या त्यांच्या आत्मचरित्राला राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण वाड्.मय पुरस्कार मिळाला आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेतर्फे त्यांचा ‘ठाणेभूषण’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.मान्यवर उपस्थितते आयुष्याचे शतक निश्चितपणे पार करतील, असे वाटत असतानाच गुरु वारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह समाजातील सर्व स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्येष्ठ लेखक बाबुराव सरनाईक यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:39 AM