ठाणे : दीर्घ कालावधी नंतर अस्तित्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पाचही पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड नूतन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ६ जानेवारीपर्यंत सभापती व १५ जानेवारीपर्यंत जि.प.अध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाव्दारे नोटिफिकेशन काढला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या हालचालींचा वेग वाढला आहे.निवडणूक आयोगाकडून या अध्यक्षांसह सभापतींच्या निवडीचे फर्मान काढले जाणार आहे. तत्पूर्वी पंचायत समिती सदस्यांची राजपत्रात नोंद घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात होणाऱ्यां अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पसंतीच्या उमेदवारासाठी सभागृहात हात वर करून सहमती दर्शवणार की अन्य पद्धतीचा वापर केला जाणार, या बाबत अद्याप काहीही निश्चित सांगितले जात नाही. शिवसेनेला अध्यक्षपदाची खुर्ची जवळची वाटत असली तरी भाजपा मात्र ते सहजासहजी होऊ देणार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या दोन्ही पक्षांचे राजकीय धुरंधर वेळप्रसंगी न्यायालयीन दरवाजे ठोठावण्याची अटकळ शोधण्याच्या प्रयत्न दिसून येत आहेत.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी या आधीही सर्वप्रकारचे डावपेच आखूनही शिवसेनेला ते शक्य झाले नव्हते. पण यावेळी जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी शिवसेनेसह भाजपा सर्व शक्तीपणाला लावणार यात शंका नाही. सत्ता स्पर्धेतील या दोन्ही पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांसह काँग्रेस व भाजपा पुरस्कृत पण सध्या शिवसेनेसोबत असलेल्या सदस्याची एक मोठ बांधण्यासाठी सर्व शक्ती, युक्ती पणाला लावावी लागणार आहे. वेळप्रसंगी या सदस्यांची पळवापळवीदेखील होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सदस्यांना लवकरच गुप्त स्थळी हलविण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत. या दरम्यान त्यांना घरीदेखील संपर्क साधता येणार नसल्याची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.