नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या कुटुंबाचा घोडबंदर मार्गावर अपघात होऊन चिमुकल्याच्या मृत्यूची घटना घडली आहे.रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमुळे हा अपघात झाला आहे. या दुर्घटनेमुळे सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.घणसोली सिम्प्लेक्स येथील माउलीकृपा सोसायटीत राहणाºया विक्रांत दास यांच्यासोबत ही दुर्घटना घडली आहे. ते पत्नी अंजू व अडीच वर्षांचा मुलगा वेदांत यांच्यासोबत मोटारसायकलवरून बोरीवलीच्या दिशेने चालले होते. विक्रांत यांची बहीण त्याठिकाणी राहत असून, रक्षाबंधनासाठी ते तिच्याकडे चालले होते. घोडबंदर मार्गावरील वेदांत रुग्णालयासमोर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणावेळी तयार झालेल्या फटीमध्ये दुचाकीचा टायर अडकून अपघात झाल्याचे विक्रांत दास यांनी सांगितले. या वेळी तिघेही रस्त्यावर पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये मुलगा वेदांत याचा मृत्यू झाला. तर पत्नी अंजू गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. दुर्घटनेमुळे दास कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर रस्त्यावरील खड्ड्यामुळे घडलेल्या या घटनेप्रकरणी संबंधितावर कारवाईची मागणीही होत आहे.
खड्ड्याने घेतला चिमुकल्याचा बळी , घोडबंदर मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 6:15 AM