भिवंडी : दहावीतील विद्यार्थी धीरज अमर जामकर (१५) बुधवारी सकाळी मित्रासोबत शिकवणीस जात असताना भादवड गावाजवळील रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी पडल्याने मागून येणा-या ट्रकखाली चिरडून तो मरण पावला. या घटनेमुळे महापालिका कारभाराविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.धीरज धामणकरनाका येथील दादासाहेब दांडेकर हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. कल्याण रोडवरील ‘अरिहंत टॉवर’मधून तो गोपाळनगर येथील पायोनियर क्लासमध्ये शिकवणीसाठी जात होता. भादवड गावाजवळ रस्त्यावरील खड्ड्यात त्यांची दुचाकी अचानक खाली कोसळली. मागून भरधाव वेगात येणाºया ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र राहुल कुंभार हाही किरकोळ जखमी झाला.या ठिकाणी उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम सुरू असून रस्त्यावर वाहने व हातगाड्या उभ्या असल्याने रस्ता अरुंद झालेला आहे. त्यातच, रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी महासभेत नगरसेवक बाळाराम चौधरी यांनी केली होती. अपघाताबाबत शांतीनगर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून चालक अमरनाथ खकनीपाल याला अटक केली आहे.
भिवंडीतील खड्ड्याने घेतला विद्यार्थ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:00 AM