- नारायण जाधव ठाणे : एकीकडे राज्य शासनाने शतकोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असताना दुसरीकडे मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणाऱ्या बहुचर्चित समृद्धी मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांतील सुमारे २७,४६३ झाडांचा बळी घेणार आहे.ठाणे हा राज्यातील वनाच्छादित जिल्ह्यांपैकी एक असून मुंबईनजीकचा जिल्हा तो म्हणून तो ओळखला जातो. राजधानी मुंबईच्या जवळ असल्याने या जिल्ह्यातील शेतजमिनीसह वनजमीन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येत असून त्यात येत्या काळात अनेक नियमांना डावलून लाखो झाडांचा बळी जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातून जेएनपीटी-दिल्ली डेडिकेट फे्रट कॉरिडोर, मुंबई-बडोदरा महामार्ग, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह शाई, काळू ही धरणे आणि संजय गांधी उद्यानातून जाणारा ठाणे-बोरिवली मार्ग व विविध इतर छोट्यामोठ्या प्रकल्पांसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर, नवी मुंबई या शहरांत त्या महापालिकांसह एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि एमआयडीसीकडून अनेक प्रकल्प नजीकच्या काळात आकार घेत आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी लाखो झाडांचा बळी जाणार आहे. कारण, यातील बहुतेक प्रकल्प जंगलपट्ट्यासह आरक्षित वनांतून जाणार आहेत. त्यांच्या उभारणीसाठी ही वृक्षकत्तल करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडे धरण प्रकल्पांसह बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदरा महामार्ग व विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये बाधित होणार आहेत.आता समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात शहापूर तालुक्यातील खर्डी येथील २४९९, धसई- ३८८८, सरळांबे, अर्जुनाली, लाहे, खुटाडी, अंबजे या गावांतील ४४३१, शेरे २२०४, शाई ४९४०, बिरवाडी ५६७८ असा वृक्षांचा बळी जाणार आहे. फळेगाव, उशीद, नडगाव, उटने या गावांतील ३८२३ झाडांच्या कत्तलीसाठी निविदा मागवल्या आहेत.>कायदा धाब्यावर,वन्यप्राण्यांचे नुकसानही गुलदस्त्यातएवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करताना वनविकास महामंडळानेच वृक्षतोडीसंदर्भातील कायद्यांना धाब्यावर बसवले आहे. यात कोणती व कशा प्रकारची झाडे जाणार आहेत, यात दुर्मीळ, अतिदुर्मीळ प्रजाती किती आहेत, त्यांचे टॅगिंग केले आहे किंवा नाही, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय, यातील किती झाडांचे पुनर्रोपण करणार, कुठे आणि कसे करणार, हे गुलदस्त्यात आहे. या वृक्षतोडीमुळे त्यात्या परिसरातील जंगलसंपत्तीसह वन्यप्राण्यांची किती व कशा प्रकारे हानी होणार आहे, त्यांच्या जीवनमानावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, याबाबतही लपाछपी खेळण्यात आली आहे.
कल्याण-शहापूरमध्ये महामार्गासाठी जाणार २७ हजार ४६३ झाडांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:51 AM