ठाणे : गावदेवी मैदानाखालील वाहनतळाच्या उभारणीवरून महापालिका प्रशासन आणि दक्ष नागरिकांमध्ये वादंग असतानाही आता पालिकेने या पार्किंगसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकत, येथील स्वच्छतागृह हटवून कामाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील भाजीमंडईसह टीएमटी कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे.
ठाणे शहराचे वेगाने नागरीकरण होत असताना शहरातील लोकांची संख्या वाढण्याबरोबरच वाहनांची संख्याही वेगाने वाढते असल्यामुळे शहरात पार्किंगची समस्या बिकट झाली आहे. त्यातही रेल्वेस्थानक परिसरात वाहन घेऊन येणाºया नागरिकांसमोर पार्किंगची समस्या सर्वाधिक आहे. मात्र, या परिसरात वाहनतळ उभारणीसाठी जागा उपलब्ध नसल्याने गांवदेवी मैदानाच्या खाली वाहनतळ उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी सुमारे २३ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत. गावदेवी मैदानाचे एकूण जागा ५१०० चौरस मीटर आहे. यापैकी ४३१० चौरस मीटर जागेत वाहनतळ उभारले जाणार आहे.
या वाहनतळामुळे मैदानाला धक्का पोहचणार नसल्याचा दावा केला आहे. मात्र या ठिकाणी मैदानाखाली वाहनतळ उभारला गेल्यास पार्किंगची समस्या दूर झाली तरी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होण्याची भीती धर्मराज्य पक्षाने व्यक्त करून या प्रकल्पाला विरोध केला आहे. काही नागरिक याप्रकरणी न्यायालयातही गेले होते. परंतु, त्यात दिलासा मिळाल्यानंतर महापालिकेने वाहनतळाचे काम वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गांवदेवी मैदानात असलेले सार्वजनिक स्वच्छतागृह तोडण्याचा निर्णय घेऊन असा प्रस्ताव तयार केला आहे.
पर्यायी जागेवर मोबाइल स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय
गांवदेव मैदान हे विकास आराखड्यात सार्वजनिक वापरासाठी राखीव ठेवले आहे. त्याची मालकी सरकारची आहे. तसेच गेल्या ४० वर्षांपासून ते महापालिकेच्या ताब्यात आहे. या ठिकाणी एक मजली पार्किंग मैदानाखाली उभारले जाणार आहे. च्या वाहनतळाच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडूनही मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर या वाहनतळाच्या आराखड्यानुसार मैदानातील स्वच्छतागृह वाहनतळासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे संबधित स्वच्छतागृह तोडण्यासाठी महासभेसमोर प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. पार्किंग प्लाझाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ नव्याने स्वच्छतागृह बांधले जाणार आहे. सध्याचे स्वच्छतागृह तोडल्यानंतर तेथे मोबाइल स्वच्छतागृह उभारले जाणार असून स्मार्ट सिटीच्या वतीने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेला सादर होणार आहे.