- नारायण जाधव
ठाणे : मुंबई मेट्रोची गोरेगावच्या आरे कॉलनीतील कारशेड रद्द करून ती कांजुरमार्ग येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयापुढील महाविकास आघाडीसमोरील अडचणीत केंद्र सरकारच्या हरकतीमुळे वाढ झाली असतानाच आता यासाठीच्या ४३.७६ हेक्टर जागेचे आरक्षण महाराष्ट्र सरकारला बदलावे लागणार आहे. यासाठी आता कुठे नगरविकास विभागाने नोटिफिकेशन काढून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.कारण, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्यांसह भाजपचा कांजुरमार्ग कारशेडला असलेला विरोध पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य जनता आणि केंद्र सरकारकडून हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकार, एमएमआरडीए आणि मुृंबई मेट्रोपुढील अडचणींत मोठी भर पडणार आहे. या कारशेडसाठी नगरविकास विभागाने एमएमआरडीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.
कांजुरमार्गच्या जागेवर ही आहेत आरक्षणे या जागेवर उद्यानासह परवडणारी घरे, पोलीस वसाहत, बेघरांसाठीचे निवारे, महावितरणची ट्रान्समिशन सुविधा, मुंबई महापालिकेच्या शाळेसह रस्त्यांचे आरक्षण एमएमआरडीएने आपल्या २०१६-२०३४ च्या विकास आराखड्यात टाकले आहे. ती रद्द करून नगररचना कायदा १९६६ च्या कलम ३७ नुसार ही आरक्षणे वगळण्याबाबत एका महिन्याच्या आत सामान्य जनतेकडून नगरविकास विभागाने हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.
कारशेड पडणार लांबणीवर- या ४३.७६ हेक्टर जागेच्या आरक्षण बदलण्यासाठी महिनाभरात आलेल्या हरकतींवर नगरविकास विभागास जनसुनावणी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर त्यावर तोडगा काढून नगररचना संचालकांची परवानगी मिळाल्यानंतरच कारशेड उभारता येणार आहे. शिवाय, पुन्हा केंद्रीय वने आणि पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागणार असल्याने ही कारशेड लांबणीवर पडणार आहे.