ठाणे - नाट्यगृहांची दुरवस्था, सोईसुविधांचा अभाव हे आपल्याकडे नेहमी दिसणारे चित्र. अभिनेता भरत जाधव यालाही नुकताच याचा अनुभव आला. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ऐन प्रयोगावेळी एसी बंद झाल्याने कलाकारांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या भरत जाधवने फेसबूकवर एक व्हिडीओ शेअर करून नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात भरत जाधव यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना एसी पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे घामाघूम झालेल्या कलाकारांना खूप त्रास सहन करावा लागला. दरम्यान, वारंवार सांगूनही एसी सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या भरत जाधवने एक व्हिडीओ फेसबूकवर शेअर करून नाराजी व्यक्त केली. तसेच 'प्रयोगासाठी नाट्यगृहे भाडे पूर्ण घेतात, परंतु सुविधांच्या नावाने बोंब असते. कधी सुधरणार?' असा सवालही भरत जाधव यांनी उपस्थित केला.
VIDEO : नाट्यगृहातील अपुऱ्या सुविधांमुळे अभिनेता भरत जाधव संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 8:41 AM