भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यात सत्तेवर असलेल्या महाआघाडी सरकारच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधत शिवसेना पक्षातील नेत्यांचं भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणले आहेत. त्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतो म्हणून उद्धव ठाकरेंचे गुंड मला गोळ्या झाडण्याच्या धमकी देत आहेत', असा गंभीर आरोप केला. तसेच, कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे एक नंबरचे घोटाळेबाज आहेत, १९ बंगल्यांचा घोटाळा केला. त्यातल्या ११ लोकांच्या टीमने घोटाळा केला. मी शिवसेना आणि ठाकरे सरकारला सांगतो, तुम्ही कितीही गुंडांना, भाईला आणि दाऊदला जरी पाठवलं तरी मी भीत नाही. तरी मी तुमचे घोटाळे उघडकीस आणणार. आम्ही कुणाला भीत नाही. आम्ही महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला जबाबदार आहोत, असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला एकप्रकारे शह दिला आहे. किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून 21 कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
आजपासून सोमय्यांभोवती झेड दर्जाचे सुरक्षा कवच
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून ४० CISF जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेत. ही झेड दर्जाची सुरक्षा आहे. किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री, नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात मोहीम सुरु केल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या. या धमक्यानंतर किरीट सोमय्या यांनी केंद्राकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. सोमय्यांची मागणी तात्काळ मान्य करत त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली. आजपासून सोमय्यांभोवती केंद्राच्या जवानांचं सुरक्षेचं कवच असेल.