ठाणे-
शिवसेनेत उभी फूट, शिंदे-फडणवीस सरकारची कायद्याची कसोटी आणि आरोप-प्रत्यारोप असा राजकीय गोंधळ राज्यात सुरू असताना दुसरीकडे मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मात्र पक्ष बांधणासाठी राज्यभर फिरत आहेत. अमित ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीला सुरुवात केली आहे आणि ते अगदी तळागळातील कार्यकर्ते तसंच तरुणांशी संवाद साधत आहेत. यात आज अमित ठाकरेंनी चक्क शरद पवारांच्या मैदानात फटकेबाजी केली. पण हे मैदान राजकीय नसून क्रिकेटचं मैदान होतं.
ठाण्यातील ढोकाळी येथील शरद पवार मिनी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या विजय शिर्के क्रिकेट अकादमीला आज अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांनाही क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याचा मोह आवरता आला नाही. विजय शिर्के अकादमीच्या मुलांसोबत त्यांनी फोटोसेशनही केलं. अमित ठाकरे यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांनी खणखणीत फलंदाजी करताना अमित ठाकरे पाहायला मिळाले. येत्या काळात राजकीय मैदानात देखील अमित ठाकरे अशीच फटकेबाजी करताना पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
अमित ठाकरे सध्या पक्षाच्या शाखांमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यात ते मग कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करणं असो किंवा मग कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणं असो दौऱ्यात ते कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणानं वेळ व्यतित करत आहेत. आज अमित ठाकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करण्याचा आनंद घेतला. याआधी त्यांनी para kabaddi मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावणाऱ्या सचिन हरिश्चंद्र तांडेल याची भेट घेतली होती. तसंच त्याच्या घरी जेवणाचाही आस्वाद घेतला होता. अशा पद्धतीनं 'लोकल कनेक्ट' ठेवणारी अमित ठाकरेंची मनमिळावू 'खेळी' राजकीय पटलावर कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं असेल.