Video: ठाण्यात 'वीर सावरकर मार्ग' फलकाची दुरावस्था; मनसेने केले भाजपावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 02:58 PM2019-12-19T14:58:49+5:302019-12-19T15:06:20+5:30
वीर सावरकरांचा अभिमान आम्हालाही आहे पण नावापुरतं राजकारण करायचं हे भाजपाचं काम आहे.
ठाणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन भाजपाने आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी भाजपाने केली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनातही उमटले.
भाजपा आमदार मी पण सावरकर अशा नावाच्या टोप्या घालून विधिमंडळ आले, राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. मात्र भाजपाकडून सावरकरांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे. दुष्काळ, शेतकरी, पाण्याचा विषय असताना याकडे दुर्लक्ष करुन फक्त वीर सावरकरांच्या नावाने राजकारण करायचे असा आरोप मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपावर केला.
तसेच ठाण्यात वीर सावरकर मार्ग अशा नावाच्या पाटीची दुरावस्था मनसेने समोर आणली. भाजपा आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयापासून १०० मीटर अंतरावर वीर सावकर मार्ग पाटी लावण्यात आली आहे. मात्र दुर्लक्षित असल्याने या पाटीवर अस्वच्छता अन् थुंकण्याचे डाग पडल्याचे दिसून आलं. यावरुन मनसेने भाजपाला कोंडीत पकडले.
याबाबत बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, वीर सावरकरांचा अभिमान आम्हालाही आहे पण नावापुरतं राजकारण करायचं हे भाजपाचं काम आहे. महाराष्ट्रातील गंभीर विषय स्वत:च्या स्वार्थासाठी बाजूला ठेवता असा आरोप करत या प्रभागात भाजपाचे नगरसेवक आहेत, आमदार संजय केळकर यांचे कार्यालयही हाकेच्या अंतरावर आहे असं असतानाही येता-जाता वाटेवरुन कधीही त्यांचे लक्ष या पाटीकडे गेले नाही. वीर सावरकर यांचे पुतळे, पाटी अशा ठिकाणची दुरावस्था काय आहे त्याकडे भाजपाने लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केली. त्याचसोबत मनसेच्या स्वखर्चातून वीर सावरकर मार्ग या पाटीची दुरुस्ती करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.
विधानसभेच्या सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत, काँग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु, हे बोलणं रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली, कामकाज पुन्हा सुरू होताच फडणवीस यांनी आपला मुद्दा लावून धरला. सावरकरांविषयी बोललेलं रेकॉर्डवर घेतलं जाणार नसेल तर त्यांच्याबद्दल कुठे बोलायचं? ही महाराष्ट्राची विधानसभा आहे की इंग्रजांची विधानसभा आहे?, असा संताप त्यांनी व्यक्त केला होता.