अंबरनाथ : तालुक्यातील सांबारी गावात आपली तहान भागविण्यासाठी एक वानर विहिरीत उतरला. मात्र, त्या वानराला विहिरीतून वरती चढता आले नाही. त्यामुळे अडकून पडलेल्या वानरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
सांबारी गावातील दगड खाणीच्या परिसरात असलेल्या विहिरीत सकाळी 9 वाजता एक वानर पाण्यासाठी विहिरीत उतरला. मात्र पुन्हा त्याला बाहेर येता न आल्याने तो त्याच विहिरीत अडकून पडला. सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना हा वानर दिसला. त्यांनी त्याला दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, वानर योग्य प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर या प्रकरणाची माहिती वन विभागाच्या अधिका-यांना देण्यात आली.
वन अधिकारी रमेश रसाळ यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि या वानराला बाहेर काढण्याचे पुन्हा प्रयत्न केले. मात्र तरी देखील त्याला बाहेर काढता आले नाही. अखेर सागर साखरे या प्राणी मित्राला घटनास्थळी बोलाविण्यात आले. साखरे यांना वानराची सुखरुप सुटका करण्याचा अनुभव असल्याने त्यांच्या मदतीने वानराला कमरेत फास टाकून वर खेचण्यात आले. तसेच त्याच्या अंगावर जाळे टाकून त्याचा कमरेवरचा फास काढण्यात आला. त्यानंतर त्याची आहे त्याच ठिकाणी सुटका करण्यात आली.
वानराची सुटका होताच गावकरांनी देखील आनंद व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने पाण्याच्या शोधात वानर आणि इतर प्राणी हे जंगलातून बाहेर पडून शेजारील गावात येत आहेत. मात्र अशा प्राण्यांवर दया दाखविण्याचे काम ग्रामस्थ करीत असल्याचे दिसत आहे.