विशाल हळदे
ठाणे – कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र ठाण्यात आज लसीकरण कार्यक्रमात पुरता गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. गेटमधून आत शिरण्यासाठी लोकांनी गोंधळ घातला होता.
खासदार राजन विचारे यांच्या तर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीपासून स्वत: राजन विचारे या कार्यक्रम स्थळी हजर होते. सुरुवातीला ३०० लोकांचं लसीकरण या कार्यक्रमातून होणार होतं. या कार्यक्रमाला आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लसीकरणासाठी आलेली संख्या पाहता आणखी २०० जणांचं लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. लसीकरणासाठी कार्यक्रमस्थळी सकाळी ६ वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या होत्या. लसीकरण कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आले होते.
या कार्यक्रमातील गर्दीचं नियोजन स्थानिक शिवसैनिक आणि पोलीस प्रशासन करत होते. परंतु गर्दीमुळे गेटवर गोंधळ उडाला. गेट बंद करण्यात आले. ओळखीच्या लोकांना आत सोडलं जात असल्याचं आरोप लोकांनी केला. त्यावेळी गेटवरील प्रकार पाहून खासदार राजन विचारे संतापले. त्याठिकाणी उभे असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका मारून ओळखींच्या आत कशाला सोडता? सकाळपासून लोकांनी रांगा लावलेत असं बजावलं. गेल्या ३-४ दिवसांपासून ठाण्यात अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यात आज ज्याठिकाणी लसीकरण केंद्र उघडण्यात आली आहेत तिथे मर्यादित लसींचा साठा असल्याने गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.
सोमवारी महापालिकेने एकाच दिवशी २२ हजार जणांचे लसीकरण करून विक्रम केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी साठा नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. त्यात मंगळवारी साठा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सलग तीन दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती.
ठाणे जिल्ह्यात अवघे २७ टक्केच लसीकरण
डेल्टा प्लसला रोखायचे असेल तर त्यासाठी लसीकरण होणे गरेजेचे आहे. परंतु, जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या अवघे २७ टक्केच लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण हे २१ टक्के तर दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे सहा टक्के आहे. जानेवारीपासून आतापर्यंत ९९ लाख ४२ हजार ४०७ लोकसंख्येच्या ठाणे जिल्ह्यात केवळ १९ लाख ८६ हजार ३०४ नागरिकांचे म्हणजेच २७ टक्केच लसीकरण झाले आहे.