ठाणे - साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना आव्हाड यांनी प्रज्ञासिंग ठाकूर यांना साध्वी म्हणणे म्हणजे संतत्वाचा अवमान आहे. जर प्रज्ञासिंग हिच्या शापाने करकरे यांचा मृत्यू होत असेल तर सईद हाफीजला त्यांचा उ:शाप आहे का? असा सवाल उपस्थित केला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विनानकारण ओढल्याचा आरोप साध्वी प्रज्ञाने एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरेंवर शुक्रवारी केला. तसेच माझ्या शापामुळेच हेमंत करकरे मारले गेल्याचे वादग्रस्त तिने केले होते. त्याचा सर्वत्र निषेध होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र, प्रज्ञासिंग ठाकूर यांचे समर्थन केले आहे. त्या निषेधार्थ शनिवारी जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या पुतळ्यासमोर आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आ. आव्हाड यांच्या हस्ते सुुरुवातीला शहीद अरुणकुमार वैद्य यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी, “ करकरे हम शर्मिंदा है, आपके कातील जिंदा है”, शहिदो के सन्मानमे हम सब मैदान मे” अशा घोषणा देत साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिचा निषेध केला.
या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार आव्हाड यांनी, प्रज्ञासिंग ठाकूर हिला साध्वी म्हणणे म्हणजे संतत्वाचा अवमान आहे. येथील संतांनी जातीअंताची लढाई लढून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. अशा स्थितीमध्ये 50 जणांचा बळी घेतल्याचा आरोप असलेल्या प्रज्ञासिंग ठाकूर हिचे समर्थन पंतप्रधान करीत असतील तर ते अत्यंत भीतीदायक आहे. प्रज्ञासिंग ठाकूर हिने करकरे यांना कंस तर त्यांच्या मारेकर्यांना कृष्णाची उपमा दिली आहे. आपल्या शापामुळे करकरे यांना मरण आल्याचे प्रज्ञासिंग ठाकूर हिने म्हटले आहे. याचा अर्थ ती कसाबला जर कृष्ण म्हणत असेल तर हा हिंदू धर्माचा अवमान आहे. जर, प्रज्ञासिंग ठाकूरचा शाप एवढा ताकदवान आहे तर तिने पाकड्या दहशतवाद्यांना शाप का दिला नाही. यावरुन जनतेने काय तो अर्थबोध घ्यावा, असे सांगितले.
सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाई करणार्या अरुणकुमार वैद्य यांची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांचा सामना करताना करकरे यांनी जीवाची पर्वा केली नाही. त्या मराठी अधिकार्यांचा पर्यायाने मराठी मातीचा अपमान प्रज्ञासिंग ठाकूर हिने केला आहे. त्याचा बदला आम्ही घेऊच! आम्ही गांधी-आंबेडकरी विचारधारेचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे शहिदांचा अवमान करणार्या प्रज्ञासिंग ठाकूर आणि तिला पाठिशी घालणार्या भाजपला मतदनाच्या दिवशी बटन दाबून त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही आ. आव्हाड यांनी दिला.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष मोहसीन शेख, विधानसभाध्यक्ष विजय भामरे, समीर पेंढारे, कैलास हावळे, संदेश पाटील, राजू साबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.