डोंबिवली - मार्च महिन्यात डोंबिवलीतल्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचं उद्धाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धाटनाचा घाट शिवसेनेने तरुणांना क्रिकेट सराव करण्यासाठी चांगले पिच उपलब्ध करुन दिलं होतं. मात्र निकालानंतर महापालिकेने या क्रीडा संकुलाकडे कशारितीन दुर्लक्ष केलं याबाबत मनसेने पोलखोल केली आहे.
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी उपाहास्मक टीका करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, डोंबिवलीत असणाऱ्या गवताळ प्रदेशात एक दुर्मिळ प्राणी आढळून आला आहे. हा दुर्मिळ प्राणी शोधण्यासाठी प्रचंड गवतात आवाज न करता मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम या प्राण्याला शोधून काढतात. हा प्राणी असतो डोंबिवलीतला क्रिकेटपटू. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून खासदार-नगरसेवक निधीतून उभारण्यात आलेल्या संकुलाची दुरावस्था मनसेने समोर आणली. या क्रिडा संकुलात मोठ्या प्रमाणात गवत उगविल्याने खेळांडूची गैरसोय होत असल्याचं मनसेने समोर आणलं आहे.
याबाबत बोलताना राजेश कदम यांनी सांगितले की, डोंबिवलीतील तरुणांची गैरसोय होत आहे. 50-60 लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या क्रिडा संकुलाची दुरावस्था हे डोंबिवलीचं दुर्दैव आहे असं शब्दात मनसेने नाराजी व्यक्त केली आहे.