- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार नरेंद्र पवार यांच्याविरोधात त्यांच्या पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले होते. इतकेच नव्हे तर, इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखतही दिली होती. त्यांनी आमदारांच्याविरोधात नाराजी व्यक्त करुन उमेदवार बदलून देण्याची जोरदार मागणी केली होती. या मागणीचा नेमका उलटा परिणाम झाला. उमेदवार बदला, असे सांगायला गेले; मात्र पक्षाने हा मतदारसंघच युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला सोडल्याने आमदार पवार यांच्यासह इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत.शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपाची पहिली यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीनुसार कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याचे कळताच त्यांच्या पक्षातील इच्छुकांसह सर्व पदाधिकाºयांनी आमदार नरेंद्र पवार यांच्या कल्याण पश्चिमेतील कार्यालयासमोर एकच गर्दी केली. आमदार पवार यांची उमेदवारी कापून मतदारसंघ शिवसेनेला दिल्याच्या निषेधार्थ आमदार पवार यांच्यासह सर्व इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. पक्षाने कल्याण पश्चिम मतदारसंघाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पक्षश्रेष्ठींनी कल्याणच्या भाजप आमदारासह पदाधिकारी व नगरसेवकांवर अन्याय केल्याची भावना व्यक्त केली. आमदार, इच्छुक, नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी त्यांचे राजीनामे पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविले आहेत.आमदार पवार यांनी सांगितले की, २००९ साली शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र देवळेकर हे शिवसेना भाजपची युती असताना पराभूत झाले होते. २०१४ साली भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी दिली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे भाजपला स्वबळावर विजय मिळाला. मी आमदार म्हणून निवडून आलो. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकास कामे केली. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिमेतून भाजपचे उमेदवार कपील पाटील यांना ६८ हजार मतांचे मताधिक्य पक्षाने मिळवून दिले. भाजपचे प्राबल्य वाढलेले असताना भाजपची जागा युतीच्या वाटाघाटीत शिवसेनेला देणे हे आम्हाला मान्य नाही. याचा फेरविचार व्हावा, अन्यथा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन वेगळा विचार करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.कपाळावर हात मारुन घेण्याची इच्छुकांवर वेळआमदार पवार यांच्या विरोधात भाजपतर्फे संदीप गायकर, साधना गायकर, वरुण पाटील, मोहन जोशी, वैशाली पाटील, चंद्रकांत तांबडे आदी उभे ठाकरे होते. पवार यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यासाठी ही इच्छुक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटली होती. त्यांच्या मागणीचा उलटा परिणाम झाला. उमेदवाराऐवजी पक्षाने मतदारसंघच सेनेला सोडल्याने, या मंडळीवर कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ आली. आज हीच इच्छुक मंडळी आमदारांचे सांत्वन करण्यात सर्वात पुढे होती. ही शिवसेनेला जागा सोडल्याने भाजपची बंडाळी कशी थोपवली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपने गमावला, आमदारासह इच्छुक, नगरसेवकांनी दिले राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:39 AM