कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ जागावाटपात भाजपकडे गेल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ येथील उपशहरप्रमुख प्रकाश तरे यांनी पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे पाठविला आहे. दरम्यान, भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.२००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड हे अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते. २००९ मध्ये २४ हजार ४७६ तर २०१४ ला ७४५ मतांनी निवडून आले होते. दोन्हीवेळेस निवडणुकीनंतर त्यांची सत्ताधारी पक्षाचे सहयोगी आमदार म्हणून त्यांची ओळख राहिली होती. त्यामुळे यंदा ते अपक्ष लढणार की एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून लढणार, याकडे लक्ष लागले होते. परंतु, भाजपवासी झालेल्या गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. ते आता भाजपचे उमेदवार म्हणून कल्याण पूर्वेतून निवडणूक लढवतील.दरम्यान, या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असल्याने हा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. उल्हासनगर महापालिकेतील विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे, माजी नगरसेवक नवीन गवळी, प्रकाश तरे, नगरसेवक महेश गायकवाड, रमेश जाधव हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने नाराज शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोर उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे.शिवसेना उपशहरप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेशशिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलेल्या प्रकाश तरे यांनी सायंकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईतील प्रदेश कार्यालयात राष्टवादीचे नेते अजित पवार आणि छगन भुजबळ, अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत तरे यांनी प्रवेश केला.दोघांचे अर्ज दाखल : कल्याण पूर्व मतदारसंघातून आतापर्यंत ५४ अर्जांचे वितरण झाले असून, मंगळवारी बालाजी गायकवाड(अपक्ष) आणि हरिश्चंद्र पाटील (संघर्ष सेना) या दोघा उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना सादर केले.
Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपकडे, गणपत गायकवाड यांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:07 AM