ठाणे - ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने ठाणे शहर विधानसभेची जागा ही शिवसेनेलाच मिळावी यासाठी आता शिवसेनेतील निष्ठावान मंडळी आग्रही झाली आहे. ही जागा भाजपला दिल्यास निवडणुकीत भाजपला सहकार्य न करण्याचा इशारा या मंडळींनी दिला असून त्यासंदर्भात टेंभी नाक्यावरील कार्यालयात एक बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या विरोधात सर्व पक्षीय मोठ बांधण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे. तसेच वेळ पडल्यास पदाचा राजीनामा देण्याची तयारी सुध्दा या मंडळींनी केली आहे. त्यामुळे ठाण्याचे आव्हान भाजपला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे.
ठाणे शहर मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर हे भाजपाचे आहेत. 2014 च्या निवडणुकीत संजय केळकर यांनी 12, 588 हजारांचे मताधिक्य घेतलं होतं. तर 2019 च्या लोकसभेत युतीचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून 1 लाख 30 हजार मतदान झालं होतं. मात्र विधानसभेत शिवसैनिकांनी या मतदारसंघात दावा केलेला आहे.
ठाण्यापाठोपाठ कल्याणमध्येही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व या दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार दिल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत असं सांगत शिवसेना शहर कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र या घोषणाबाजीत शिवसैनिकांनी दिलेल्या विशेष घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बाळासाहेबांना मानणाऱ्या शिवसैनिकांचा विजय असो या घोषणेने अनेकांच्या भूवया उंचावल्या. या घोषणेवरुन कुठेतरी शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंना मानणारा गट वेगळा पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतो. या वादाची पहिली ठिणगी कल्याणमध्ये पेटली आहे.
शिवसेनेचे प्राबल्य असताना या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी भाजपविरोधात उमेदवार दिला जाईल. ही पक्षाविरोधात बंडाळी नसून भाजपविरोधात उपसलेले हत्यार असल्याचा दावा इच्छुकांनी केला आहे. २०२० मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कल्याण पश्चिम व पूर्व विधानसभा भाजपला दिल्यास त्याचे परिणाम या निवडणुकीवर होण्याची शक्यताही इच्छुकांनी व्यक्त केली.