- कुमार बडदेमुंब्रा : निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही शिवसेनेने मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही किंवा इच्छुक असलेल्यांना ए बी फॉर्म दिलेले नाही. यामुळे या मतदारसंघातील इच्छुकांप्रमाणेच शिवसैनिकदेखील कमालीचे संभ्रमित झाले आहेत. सुधीर भगत आणि राजेंद्र साप्ते या माजी नगरसेवकांसह एकूण चौघे या मतदारसंघातून इच्छुक आहेत. परंतु, इच्छुकांपैकी बहुतांश जणांनी अर्ज घेतलेला नाही तसेच पक्षानेही बुधवारी संध्याकाळपर्यंत अर्ज दाखल करण्याबाबतचे कुठलेही निर्देश त्यांना दिले नसून, ए बी फॉर्मदेखील दिले नसल्याची माहिती दोन्ही माजी नगरसेवकांनी दिली.या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाबाबत पक्ष पाळत असलेल्या कमालीच्या गुप्ततेमुळे शिवसैनिक कमालीचे संभ्रमित झाले आहेत. शेवटच्या क्षणी पक्षाने उमेदवाराची घोषणा केल्यानंतर उरणाऱ्या कमी वेळात उमेदवाराचा प्रचार कसा करायचा, याबाबत ते द्विधा मन:स्थितीमध्ये सापडले असल्याची माहिती काही शिवसैनिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.दरम्यान, विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून जरी अर्ज दाखल केला असला, तरी पक्षक्षेष्ठी त्यांना मुंब्रा-कळव्यातून निवडणूक लढविण्याचे निर्देश देण्याची शक्यता असल्याची माहिती साप्ते यांनी दिली. दरम्यान, भोईर हे मुंब्रा-कळवा नाही, तर कल्याण ग्रामीणमधूनच निवडणूक लढवणार असल्याचा ठाम दावा त्यांचे स्वीय सहायक निलेश चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना केला.
Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यात शिवसैनिक संभ्रमात, उमेदवार गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 12:54 AM