ठाणे : शिवसेना आणि भाजपकडून पहिली यादी जाहीर झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बहुतेक मतदार संघांचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु, मुंब्रा -कळवा या मतदारसंघातून शिवसेनेच्या कोणत्या शिलेदाराला संधी मिळणार हे गुलदस्त्यात आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांनी या मतदारसंघातून लढावे म्हणून श्रेष्ठींनी आग्रह धरला होता. मात्र, त्यांनी याला साफ नकार दिला असून कल्याण ग्रामीणमधून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे मुंब्रा -कळवा मतदारसंघात राष्टÑवादीचे जितेंद्र आव्हाड यांना कोण टक्कर देणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.आव्हाड यांना घेरण्यासाठी वंचित आघाडीने अनिल भगत यांना संधी दिली आहे. तर एमआयएमच्या वतीने मुंब्य्रातील बरक्तुला एली हसन शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेला हा मतदारसंघ मिळालेला आहे. शिवसेनेच्या वतीने इच्छुकांमध्ये राजेंद्र साप्ते, प्रदीप जंगम आणि सुधीर भगत यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, असे असतांनाही सुभाष भोईरांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा दबाव श्रेष्ठींकडून टाकला जात होता. त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातून रमेश म्हात्रे यांचे नाव आघाडीवर आले होते. भोईर यांची मनधरणी करण्यात श्रेष्ठींना यश आले नसून भोईर यांनी ३ आॅक्टोबर ऐवजी १ तारखेलाच कल्याण ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करून आपल्याच पक्षाला आव्हान दिले आहे. असे असले तरी भोईर नाही तर मग कोण असा प्रश्न शिवसेनेपुढे उभा ठाकला आहे.घेरण्याची तयारीठाण्यातील चार मतदारसंघाचे चित्र जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. मुंब्रा - कळव्यातील चित्रही समोर आले आहे. येथून जितेंद्र आव्हाड ३ आॅक्टोबर रोजी अर्ज भरणार आहेत. त्यांना घेरण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमने उमेदवार देऊ केला आहे.
Vidhan sabha 2019 : मुंब्रा-कळव्यातून सेनेची संधी कुणाला? आव्हाडांना टक्कर कुणाची?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 1:42 AM