त्यांनी अवघ्या २६ हजारांत मारली विधानसभेची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:05 AM2019-09-27T00:05:41+5:302019-09-27T00:06:08+5:30
माजी आमदार श्रीरंग शिंगे; निवडणूक खर्चावर मर्यादा असणे गरजेचे
आसनगाव : शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या ४७ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत केवळ २६ हजार रुपये खर्च करून काँग्रेसचे श्रीरंग शिंगे यांनी आमदारकी मिळवली होती. आताच्या निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या निवडणूक खर्चावर मर्यादा आणल्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत शिंगे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात १९७२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार तथा मौजे सारमाळ येथील रहिवासी श्रीरंग रामा शिंगे हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी मोजकेच राजकीय पक्ष अस्तित्वात होते. शिंगे यांच्याविरोधात जनसंघ पक्षाचे उमेदवार मोहिनीराज मुळे, शेतकरी कामगार पक्षाचे आंबेकर आणि अन्य दोन असे चार उमेदवार होते. त्यावेळी शहापूर तालुका व मोखाडा तालुक्यातील १९ गावे मिळून शहापूर विधानसभा मतदारसंघ होता.
या मतदारसंघातील निवडणुकीत शिंगे यांना केवळ २६ हजार रुपये इतका खर्च आला होता. त्यावेळी फक्त एक जीप घेऊन मतदारसंघात प्रचारासाठी फिरल्याचे शिंगे सांगतात. विशेष म्हणजे त्याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे पाच वर्षे उलटूनही महाराष्ट्र सरकार बरखास्त केले नव्हते. त्यावेळी वसंतराव नाईक यांचे सरकार जवळपास सहा वर्षे चालले होते. त्यामुळे शिंगे यांनाही शहापूर तालुक्यात सहा वर्षे काम करायला मिळाले होते. सध्या माजी आमदार म्हणून ५० हजार रुपये पेन्शन, मोफत प्रवास आणि वैद्यकीय उपचारांसाठी वर्षाकाठी एक लाख रुपयांच्या सुविधा शासनाकडून मिळतात. विधानसभा सदस्यत्वाचा सहा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पक्षाने दुसऱ्यांदा तिकीट देऊ करूनही शिंगे यांनी ते नाकारले होते. त्यानंतर, पुन्हा कोणतीच निवडणूक त्यांनी लढवली नाही. मी निवडणूक लढवली त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात मोठा फरक असला तरी, निवडणुका आदर्श पद्धतीने व्हायला हव्यात. निवडणुकीत होणारी कोट्यवधींची उलाढाल कुठेतरी थांबायला हवी.
काँग्रेसचा विक्रम मोडलेला नाही
१९७२ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण २७० जागा होत्या. त्यावेळी काँग्रेसने २२२ जागा जिंकल्या होत्या.
तत्पूर्वी १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने २०२ जागा जिंकण्याचा विक्रम नोंदवला होता. काँग्रेसचा हा विक्रम आजवर कुणी मोडला नाही, अशी आठवणही त्यांनी सांगितली.