ठाणे : ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. त्यांना ११२ मते मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचा पराभव झाला असून त्यांना ७८ मते मिळाली.
विद्यमान पॅनलच्या दोन गटांमध्ये निवडणूक झाली होती. विद्याधर ठाणेकर आणि विद्याधर वालावलकर असे दोन गट आमने सामने होते. या अटीतटीच्या निवडणुकीत ठाणेकर गटातून सर्वाधिक सदस्य निवडून आले. ठाणेकर गटातून आठ पैकी सात तर वालावलकर गटातून चार जण निवडून आले आहेत. रविवारी ही त्रैवार्षिक निवडणूक पार पडली. मराठी ग्रंथ संग्रहालयात निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी या नात्याने वरिष्ठ पदावरून निवृत्त झालेले ज्येष्ठ अधिकारी भरत अनिखिंडी यांनी काम पाहिले.
कार्यकारी मंडळाच्या सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते विनायक गोखले यांनी घेतली त्यांच्यासह केदार बापट, निर्मोही फडके, नरेंद्र जोशी, वृषाली राजे, अश्विनी बापट, निशिकांत महांकाळ, कृष्णकुमार कोळी, संजीव फडके, सुजय पत्की, सीमा दामले हे ११ सदस्य निवडून आले. प्रकाश दळवी, विद्याधर वालावलकर आणि आशा जोशी यांच पराभव झाला.